

Bagalkot School Food Poisoning
अंकली: बागलकोट जिल्ह्यात मुधोळ तालुक्यातील मुगळखोड येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर १२ विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अस्वस्थ झालेल्या १२ विद्यार्थ्यांपैकी ९ जणांवर मुधोळ सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित ३ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी बागलकोट जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दुपारचे मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने शाळेत एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेत तपास सुरू केला आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.