Chandrapur house break-in case
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात वाढत असलेल्या मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बंद घरांची रेकी करून घरफोडी करणाऱ्या परराज्यातील सराईत चोरास अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून तब्बल १९ लाख ८४ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार पोलीस ठाणे रामनगरचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी त्यांच्या अधिपत्याखालील गुन्हे शोध पथकाला घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अप.क्र. १०३५/२०२५ व १०३६/२०२५ या दोन घरफोडीचे गुन्हे एकाच पद्धतीने व एकाच कालावधीत झाल्याचे निदर्शनास आले.
तांत्रिक तपास व गोपनीय यंत्रणा सक्रिय केल्यानंतर मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, मुस्तकीन मो. शौकीन चौधरी (वय ४३ ) रा. समर गार्डन कॉलनी, मेरठ (उत्तरप्रदेश), सध्या रा. नेहरू शाळेमागे, चंद्रपूर हा इसम घरांची दारे-खिडक्या बसविण्याचे व दुरुस्तीचे काम करण्याच्या बहाण्याने शहरात फिरत बंद घरे हेरत होता. त्यानंतर तो स्वतःच्या चारचाकी वाहनातून येऊन घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले.
रामनगर पोलिसांनी सदर आरोपीवर गोपनीयरीत्या पाळत ठेवून, तो चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी घेऊन जात असताना त्यास ताब्यात घेतले. तपासाअंती आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण १९,८४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे तसेच पोलीस अंमलदार लालु यादव, शरद कुडे, आनंद खरात, बाबा नैताम, रामप्रसाद नैताम, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, प्रफुल्ल पुप्पलवार, सुरेश कोरवार, ब्ल्युटी साखरे व पंकज पोंदे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.