चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम प्रकल्प जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहेत. इरई प्रकल्प ९६.१८% भरलेला असून सकाळी ७:३० वाजता त्याचे तीन दरवाजे प्रत्येकी ०.२५ मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन मोठे व आठ मध्यम प्रकल्प आहेत . त्यापैकी आसोलामेंढा व इरई शंभर टक्के भरले आहे. तर मध्यम प्रकल्पापैकी घोडाझरी, नलेश्वर, चंदई, अमलनाला, चारगाव लाभाणसराड, पगडीगुड्डम, डोंगरगाव आदी आठही तलाव ही शंभर टक्के भरले आहेत.\
मागील चौवीस तासात इरई प्रकल्प परिसरात पाऊस पडल्याने 0.25 मीटरने तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. असोलामेंढा व इरई धरणातील पाणीसाठा शेती व इतर गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. आणि सध्या पुरेसा साठा उपलब्ध आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
इरई नदीकाठच्या भागात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचा व सुरक्षिततेसाठी सूचना पाळण्याचा सल्ला दिला आहे.
मागील 24 तासात काही प्रकल्प परिसरात १५ मिमी ते ३० मिमी पर्यंत पाऊस झाला असून पुढील काही दिवसांतही पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे आणि जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने खरीप हंगामातील पिकांना वेळेवर पाणी मिळण्याची शक्यता वाढली आहे.