

Warora taluka cotton crop damage
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आणि अठ्ठेचाळीस तासापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने वरोरा तालुक्यातील बामहणडोह नाल्याला पूर आल्याने नाल्याकाठावरील शेकडो हेक्टरवरील कापूस भूईसपाट झाला आहे. शेतजमिनीमध्ये पुराचे पाणी साचल्याने कापूस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपतकालीन संकटामुळे कापूस उत्पादक संकटात असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
वरोरा तालुक्यात कापूस हे प्रमुख पीक तर सोयाबीन हे दुय्यम पीक आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने कापसाची लागवड केली होती. पिके दोन फुटांपर्यंत वाढली असताना गेल्या २४ तासांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. बामणडोह नाल्याला पूर आल्याने काठावरील शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. परिणामी हिरवेगार कापसाचे पीक पाण्याखाली जाऊन भुईसपाट झाले असून, पिक पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बामणडोह नाला परिसरातील बटाळा, आसरा, बोरगाव, बांद्रा आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टरवरील कापूस पिकांची नासाडी झाली आहे. हंगामाचा पूर्ण कालावधी संपल्यामुळे नव्याने लागवड करणे आता शक्य नाही. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात सध्या "येलो अलर्ट" घोषित करण्यात आलेला असून, पुढील काही दिवसांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्यापिकांवर नुकसानीचे संकट कायम आहे. सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.