

चंद्रपूर : मागील चोवीस तासात चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला आहे. सर्वात जास्त बल्लापूर तालुक्यात ९० मिमी नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सरासरी ५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. चंद्रपूर लगतच्या इरई धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले असून नदी काठावरील गावांना सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे. तर चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा व कोरपना तालुक्यातील १३ मार्ग बंद झाले आहे. कोरपना तालुक्यात पुरात अडकलेल्या बारा नागरिकांना तालुका प्रशासनाने रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलविले आहे.
गेल्या २४ तासांत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार मुसळधार पाऊस कोसळला. जिल्ह्यात सरासरी ५० मि.मी. पावसाची नोंद करण्यातआली आहे. सर्वाधिक पाऊस बल्लारपूर तालुक्यात ९०.५ मि.मी. नोंदवला गेला आहे. त्याशिवाय भद्रावती ७७.१, वरोरा ७६.३, चंद्रपूर ७२.९, पोंभुर्णा ५३.९, नागभीड ४७.३, सिंदेवाही ४७.१, जीवती ४५.२, राजुरा ४२.८, चिमूर ४१.२, कोरपना ४०.९ मि.मी. इतका पाऊस झाला आहे.
चंद्रपूर शहरापासून जवळच असलेल्या इरई धरणातील पाणी पातळी वाढल्याने इरई धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडण्यात आले आहेत. तीन गेट १ मीटर व चार गेट ०.७५ मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे लगतच्या नदी नाल्यांचा प्रवाह वेगाने वाढला आहे.
नदी काठावरील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा, हडस्ती, चारवट, कवटी, तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना व इतर गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदी–नाल्यांच्या काठावर जाणे टाळावे, सुरक्षित स्थळी हलावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टी व धरण विसर्गामुळे जिल्ह्यात अनेक मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने एकूण १३ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याची माहिती दिली. चंद्रपूर तालुक्यातील पुलावर पाणी आल्याने धानोरा ते भोयगाव मार्ग बंद झाला आहे. मुल तालुक्यात फिस्कुटी ते चिचाळा नदीवरील पूलावरून पाणी वाहत असलयाने मार्ग बंद झाला आहे.
चिरोली ते केळझर आणि चिचोली गावाजवळील रेल्वे बोगद्यात पाणी साचल्याने काटवन–मुल मार्ग बंद झाला आहे. प्रवाशांसाठी मारोडा मार्ग पर्याय म्हणून उपलब्ध आहे. वरोरा तालुक्यातील कोसरसार ते बोडखा रस्ता बंद आहे. अर्जुनी पुलावर पाणी आल्याने चारगाव खुर्द ते अर्जुनी मार्ग बंद झाला आहे. तसेच मौजा सुर्ला ते जामगाव खुर्द मार्ग पुराच्या पाण्याखाली आला आहे.
भद्रावती तालुक्यातील मौजा गुंजाला नाल्यावर पाणी वाढल्याने नाल्याशेजारी काही घरांतध्ये पाणी घुसले आहे. गुंजाला–कचराळा रस्ता बंद झाला आहे. कोरपना तालुक्यातील इरई भरोसा मार्ग बंद झाला आहे. तसेच पुलावरून पाणी वाहत असल्याने भोयेगाव धानोरा मार्ग बंद झाला आहे. बल्लारपूर तालुक्यात पळसगाव–कवडजई मार्गावरील पूल तीन फूट उंच पाण्याखाली आल्याने मार्ग बंद झाला आहे. इरई नदीवरील पुलावर पाणी आल्याने चारवट माना चंद्रपूर मार्ग बंद झाला आहे. तसेच काटवली ते बामनी मार्ग बंद झाला आहे.
सोमवारी (दि. २) रात्री कारव बल्लारपूर रस्त्यालगत नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या १२ नागरिकांना प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले. रात्री १२ वाजता मिळालेल्या माहितीवरून आपत्ती व्यवस्थापन पथकाने धाडसाने कार्यवाही करत त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. कारवा येथील सोमाजी नाईक आश्रम शाळेतमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील एकूण हंगामी पावसाचे प्रमाण ९० टक्के झाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १२४ टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. खरीप पिकांना याचा फायदा झाला असला तरी अतिवृष्टीमुळे वाहतूक, दळणवळण व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.