पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत पाच आरोपींना अटक केली Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Crime | धाबा पोलिसांची मोठी कारवाई: गोजोली जंगलातून २३ लाखांच्या हायटेंशन पॉवर केबल जप्त; पाच आरोपी जेरबंद

८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, हायड्रा, आयशर वाहने आणि होंडा सिटी कारही ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Dhaba Police Action

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली जंगल परिसरातून तब्बल २३ लाख ८८ हजार रुपयांच्या हायटेंशन पॉवर केबल ड्रमची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात धाबा पोलिसांना मोठे यश आले आहे.  पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत पाच आरोपींना अटक करून चोरीस गेलेली केबल, वाहने आणि मोबाईलसह एकूण ८८ लाख ३४ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी समीर रमेश डिवरे (वय ४७, रा. समर्थ नगरी, सोनेगाव, नागपूर) यांनी धाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. डिवरे हे डस्कलाईन इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर या कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. सदर कंपनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीसाठी (MSEDCL) नवीन विद्युत लाईन उभारणीचे काम करीत आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली-वटराणा जंगल परिसरात भूमिगत वीज केबल टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी सुकवासी फाटा परिसरात 19/33 केव्ही हायटेंशन पॉवर केबलचे दोन मोठे ड्रम ठेवण्यात आले होते. मात्र ११ एप्रिल ते २७ एप्रिल २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हे दोन्ही ड्रम चोरून नेले.

तक्रारीनंतर धाबा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला.

या कारवाईत राकेश जागेश्वर भोयर (रा. खरबी रोड, नागपूर), ज्योतिष प्रभू प्रसाद (रा. पारडी, नागपूर), अभिनयकुमार रामलक्षण प्रसाद (मूळ उत्तरप्रदेश), हरिप्रसाद श्यामजी उईके (मूळ मध्यप्रदेश) आणि दिपक बेकर उईके (मूळ मध्यप्रदेश) या पाच आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले 19/33 केव्ही हायटेंशन पॉवर केबलचे दोन ड्रम, एक हायड्रा क्रेन, दोन आयशर वाहने, एक होंडा सिटी कार तसेच विविध मोबाईल फोन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८८ लाख ३४ हजार ३०५ रुपये इतकी आहे. चोरीस गेलेल्या केबलपैकी प्रत्येकी सुमारे ५०० मीटर केबल आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली धाबा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि सुबोध वंजारी, पोलीस अंमलदार श्रावण कुत्तरमारे, प्यारेलाल देव्हारे, गजानन तुरेकर आणि रामेश्वर पाल यांनी ही कारवाई केली.

सध्या सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून न्यायालयाने त्यांना ८ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास धाबा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुबोध वंजारी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT