Chandrapur Crime : पत्नीनेच पतीच्या खुनासाठी दिली सुपारी; चार आरोपी अटकेत

१ लाख रुपयांत रचला कट; कारमध्ये गळा आवळून हत्या, मृतदेह शेतात फेकला
Chandrapur Crime
Chandrapur Crime
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले असून पत्नीनेच पतीच्या हत्येसाठी सुपारी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली कार व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

मौजा घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ हनुमान मंदिर परिसरात एका इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. २ मे २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असता त्याची ओळख रविंद्र तुळशिराम कुळमेथे (वय ४६, रा. मुधोली, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) अशी पटली.

प्राथमिक चौकशीत हा मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून आल्याने भद्रावती पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, मृतकाची पत्नी दिपमाला रविंद्र कुळमेथे हिनेच आपल्या पतीच्या खुनासाठी इतर आरोपींना १ लाख रुपयांची सुपारी दिली होती.

या प्रकरणात वर्षा राजू परचाके, सोनू उर्फ प्रविण नरेंद्र कालोकर आणि नाझीर नसरूल अंसारी यांनी संगनमताने कट रचला. १ मे २०२६ रोजी त्यांनी रविंद्र कुळमेथे यांना कारमध्ये बसवून घोडपेठ येथील सुनसान परिसरात नेले. तेथे कारमध्येच त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पळून गेले.

भद्रावती पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपींना वरोरा व नागपूर येथून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून कार (MH 31 DC 8919) आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे गुन्हा क्रमांक ५५०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(२), १४०(२), ६१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news