Nylon Manja Ban Chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पतंग उडवण्याच्या हंगामात वाढत्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे पक्षी व नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक भूमिका घेत नायलॉन मांजा खरेदी, विक्री व वापरावर पूर्णतः बंदी लागू केली आहे.
उल्लंघन करणाऱ्यांवर 50,000 ते 2,50,000 रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होणार आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस विभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलिस विभागाने नागरिक व व्यावसायिकांना नायलॉन मांजाच्या वापरासंदर्भात कडक सूचना जारी केल्या आहेत. नायलॉन मांजा हा पर्यावरण व मानवी जीवासाठी अत्यंत घातक असून, पतंग उडवताना त्याच्या धारदार तंतूमुळे अनेक पक्ष्यांचा जीव जातो, तर काही वेळा नागरिकही गंभीर जखमी होतात. याच कारणामुळे महाराष्ट्र शासन व मा. उच्च न्यायालय नागपूर यांनी जनहित याचिका क्र. 28.1.2021 अंतर्गत आदेश देत नायलॉन मांजावर कायदेशीर बंदी घातली आहे.
तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक 01/03/2023 च्या अधिसूचनेनुसार नायलॉन मांजाची खरेदी, विक्री, साठवणूक आणि वापर करणे हा कायद्याने गुन्हा घोषित करण्यात आला आहे.या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये
लहान मुल किंवा प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवतांना आढळल्यास — 50,000/- रुपये दंड तर कोणताही व्यवसायिक किंवा नागरिक नायलॉन मांजाचा साठा ठेवतांना किंवा विक्री करतांना आढळल्यास 2,50,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
पोलिस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, नायलॉन मांजाचा वापर, खरेदी किंवा विक्री करू नये. तसेच कोणीही नायलॉन मांजा विक्री, साठवणूक किंवा वापरतांना आढळल्यास, तात्काळ चंद्रपूर पोलीस नियंत्रण कक्षाच्या 112 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, जेणेकरून वेळेत कारवाई करता येईल.
प्रशासन व पोलिस विभागाच्या या सूचनांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे जीवितहानी टाळण्यासाठी सर्वांनी सुरक्षित सुती मांजाच वापरावा आणि घातक मांजाविरोधात जागरूक नागरिक म्हणून तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.