चंद्रपूर : जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करत चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अभिलेखावरील कुख्यात गुंड आणि धोकादायक व्यक्ती असलेल्या शाहरूख शेरखान पठाण (वय २९) रा. रविंद्रनगर वार्ड, बल्लारपूर) याला महाराष्ट्र प्रतिबंधात्मक अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे
शाहरूख पठाण याच्या विरोधात बल्लारशा पोलीस ठाण्यात जबरी चोरी, दुखापत, आमली पदार्थ विक्री, विनयभंग, अश्लील भाषेत शिवीगाळ अशा एकूण ९ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. प्रतिबंधात्मक कारवाया करूनही तो सुधारणेच्या मार्गावर न आल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याच्यावर कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशावरून एमपीडीए कायद्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला. सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यांनीही या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत, दिनांक २४ जुलै २०२५ रोजी शाहरूख पठाण यास एक वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.
या कारवाईदरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी गडचांदूर रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानीय गुन्हे शाखा, चंद्रपूर), ठाणेदार विपीन इंगळे (बल्लारशा पोलीस ठाणे), तसेच स.पो.नि. पठाण, पो.कॉ. मिलिंद आत्राम, सपोनि योगेश खरसान, स.फौ. अरुण खारकर, पोहवा सुधीर मत्ते, पोहवा परीवरीश शेख, पोहवा संजय वाढई, महिला अंमलदार छाया निकोडे, उषा लेडांगे, अपर्णा मानकर यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.