Chandrapur news 
चंद्रपूर

Blasting vibrations threat chandrapur : ब्लास्टिंगच्या कंपनांनी अभ्यंकर वॉर्डातील घरांना धोका; नागरिकांची खासदारांकडे धाव

एकोना कोळसा खाणीतील ब्लास्टिंगमुळे घरांना तडे व इमारतींचे नुकसान झाल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : वरोरा शहरातील अभ्यंकर वॉर्ड परिसरातील नागरिकांनी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (WCL) एकोना कोळसा खाणीतील ब्लास्टिंगमुळे निर्माण होणाऱ्या तीव्र कंपनांविरोधात खासदारांकडे धाव घेतली आहे. ब्लास्टिंगच्या वेळी होणाऱ्या कंपनांमुळे घरांच्या भिंतींना तडे जाण्यासह प्लास्टर व खिडक्यांचे नुकसान होत असल्याचा दावा नागरिकांनी केला असून, ब्लास्टिंगची तीव्रता नियंत्रित करून नागरिकांच्या मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अभ्यंकर वॉर्डाच्या पश्चिम दिशेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एकोना कोळसा खाण आहे. खाणीमध्ये दररोज दुपारी ३ वाजल्यानंतर करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगच्या वेळी परिसरातील घरांना मोठ्या प्रमाणात कंपन जाणवतात. या कंपनांमुळे काही घरांच्या भिंतींना तडे गेले असून प्लास्टर तसेच खिडक्यांचे नुकसान झाल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. काही व्यावसायिक इमारतींनाही या कंपनांचा फटका बसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी

ब्लास्टिंगमुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच ब्लास्टिंगच्या वेळी निर्माण होणाऱ्या कंपनांची शास्त्रीय पद्धतीने मोजणी करून त्याचा परिसरातील घरांवर नेमका किती परिणाम होतो, याची तज्ज्ञांकडून तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

नागरिकांच्या मालमत्तेची तसेच जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन एकोना खाणीतील ब्लास्टिंगवर आवश्यक नियंत्रण आणावे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांच्या या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेविका सौ. रोशनी संदीप भडके यांनी दिला आहे. त्यामुळे या तक्रारीची प्रशासन तसेच WCLकडून दखल घेऊन कोणती कार्यवाही केली जाते, याकडे अभ्यंकर वॉर्डातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT