Pudhari News
चंद्रपूर

Chandrapur Drought : दुष्काळाचा कहर! करपलेले धानपीक रोटावेटर फिरवून नष्ट करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

तुकूम गावातील दोन शेतकऱ्यांचे साडेपाच एकरांतील पीक केले रोटावेटर फिरवून नष्ट

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Drought Paddy Crop Destroyed Rotavator

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धानपीक करपून गेले आहे. सिंचनाच्या सुविधांचा अभाव आणि परतीच्या पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे शेतकऱ्यांवर उभ्या पिकावर रोटावेटर फिरवून ते नष्ट करण्याची वेळ आली आहे. तुकूम गावातील माणिक धर्माजी दोहितरे आणि अशोक मुकरू बनकर या दोन शेतकऱ्यांनी अनुक्रमे तीन एकर आणि अडीच एकरांतील करपलेले धानपीक रोटावेटर फिरवून नष्ट केले. शेतीसाठी हजारो रुपये खर्च करूनही पदरी काहीच न पडल्याने आता कर्जाची परतफेड कशी करायची आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

लाखोंच्या आशेवर पाणी

नागभीड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कूम येथील शेतकरी माणिक धर्माजी दोहितरे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. यंदा त्यांनी आपल्या शेतात चिन्नोर जातीच्या धानाची लागवड केली होती. शेतीच्या मशागतीपासून लागवड आणि इतर कामांसाठी त्यांना सुमारे ७० ते ७५ हजार रुपये खर्च आला. मात्र, त्यांची संपूर्ण शेती कोरडवाहू असल्याने पावसावरच पिकाची मदार होती. शेतात सिंचनासाठी एक छोटीशी बोडी असली, तरी यंदा अत्यल्प पावसामुळे तीही आधीच आटली. त्यामुळे पिकाला दुसरे पाणी देण्याची कोणतीही सोय उरली नाही. परिणामी, तीन एकरांतील संपूर्ण धानपीक करपून गेले.

तीन एकरांतील पीक नष्ट

अखेर हातात पीक येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी दोहितरे यांनी आपल्या शेतातील करपलेल्या पिकावर रोटावेटर फिरवून ते नष्ट केले. दोहितरे यांच्या कुटुंबात वडील आणि दोन मुले आहेत. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. यंदाच्या हंगामासाठी त्यांनी सोसायटीकडून सुमारे ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. पीकच हाती आले नसल्याने या कर्जाची परतफेड कशी करायची, कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा, या विवंचनेत ते सापडले आहेत.

दुसऱ्या दिवशी आणखी एका शेतकऱ्याने केले पीक उद्ध्वस्त

दोहितरे यांच्यानंतर दुसऱ्याच दिवशी, २५ ऑक्टोबर रोजी तुकूम येथील ६४ वर्षीय शेतकरी अशोक मुकरू बनकर यांनीही आपल्या अडीच एकर शेतातील करपलेल्या धानपिकावर रोटावेटर फिरवून ते नष्ट केले. बनकर यांनी यंदा परभणी चिन्नोर जातीच्या धानाची लागवड केली होती. लागवड आणि इतर शेतीकामांसाठी त्यांना सुमारे ८० हजार रुपये खर्च आला. स्वतःकडील पैसे आणि इतरत्र पैशांची जुळवाजुळव करून त्यांनी पीक उभे केले होते. मात्र, पावसाने दडी मारल्याने आणि सिंचनाची पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांच्या अडीच एकरांतील संपूर्ण पीक करपले.बनकर यांच्या कुटुंबात सहा सदस्य असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह याच अडीच एकर शेतीवर अवलंबून आहे. डोळ्यांसमोर पीक उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली. अखेर निराश होऊन त्यांनी करपलेल्या पिकावर रोटावेटर फिरवून शेत मोकळे केले.

तुकूममधील शेकडों शेतकरी संकटात

तुकूम गावात सिंचनाच्या पुरेशा सुविधा नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून राहावे लागते. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने गावातील सुमारे शंभर ते दीडशे शेतकऱ्यांची 200 ते 250 एकरातील पिकांची नुकसान होताना दिसत आहेत. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने उत्पादनाच्या आशा मावळल्या आहेत.आतापर्यंत पावसाच्या भरवशावर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यंदा मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. बियाणे, खते, मशागत आणि लागवडीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे.

शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

दुष्काळाची तीव्रता वाढत असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, यापूर्वी मिळालेल्या मदतीचा अनुभव लक्षात घेता शेतकरी चिंतेत आहेत. नागभीड तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची व्याप्ती मोठी असल्याने प्रशासनाकडून प्रत्यक्ष पंचनामे, नुकसानीचे अचूक मूल्यमापन आणि नुकसानभरपाईबाबत काय पावले उचलली जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT