Chandrapur Ghodazari Lake Canal Breach
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील ऐतिहासिक घोडाझरी तलावातून हजारो एकर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असली, तरी या तलावाचा ब्रिटिशकालीन कालवा आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागभीड व सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावांपर्यंत पाणी पोहोचविणाऱ्या या कालव्याची अवस्था अत्यंत जर्जर झाली असून, सिंचन हंगाम सुरू होण्यापूर्वीच कालवा फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ब्रिटिशकालात उभारण्यात आलेल्या घोडाझरी तलावासह त्याच्या कालव्याची निर्मिती करण्यात आली होती. या कालव्यातून नागभीड व सिंदेवाही तालुक्यातील हजारो एकर शेतीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या कालव्याची नियमित व कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, दरवर्षी कुठे ना कुठे कालवा फुटण्याच्या घटना घडत असून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कालवा फुटल्यानंतर सिंचन विभागाकडून केवळ तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र, ही उपाययोजना काही दिवसांतच निष्प्रभ ठरते आणि पुन्हा त्याच ठिकाणी भगदाड पडून पाण्याची गळती सुरू होते. कायमस्वरूपी दुरुस्तीच्या अभावामुळे दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
यंदा अद्याप घोडाझरी तलावातून कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नसले, तरी त्यापूर्वी कालव्याची संपूर्ण तपासणी व दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मात्र, सिंचन विभागाने अद्यापही आवश्यक कामे हाती घेतलेली नसल्याचे चित्र आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे नागभीड तालुक्यातील येनोली ते सोनापूर मार्गावरील दत्तू लोखंडे यांच्या शेताजवळ कालव्याची पाळ मोठ्या प्रमाणात खचण्याच्या स्थितीत आली आहे. अनेक ठिकाणी कालव्याच्या कडेला खड्डे पडले असून, पाणी सोडल्यानंतर हे ठिकाण धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास कालवा फुटून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
काही दिवसांपूर्वीच गोसीखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याला नागभीड तालुक्यातील ओवळा गावाजवळ भगदाड पडल्याची घटना घडली होती. मागील वर्षीच या उपकालव्याचे काम पूर्ण झाले होते आणि प्रथमच त्यातून पाणी सोडण्यात आले होते. मात्र, कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले.
याशिवाय सावली तालुक्यातील आसोला-मेंढा तलावाच्या गोवर्धन कालव्याची पाळही धोकादायक अवस्थेत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला. कालव्याची पाळ फुटण्याच्या स्थितीत असताना संबंधित ठिकाण प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
सिंचनासाठी उभारण्यात आलेले तलाव व कालवेच जर्जर अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन घोडाझरीसह इतर सर्व प्रमुख कालव्यांची तातडीने दुरुस्ती करावी, पाण्याचा अपव्यय रोखावा आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचेल, यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सिंचनासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले तलाव आणि कालवेच आज जीर्ण अवस्थेत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीला वेळेवर पाणी मिळावे, पाण्याचा अपव्यय थांबावा आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत सिंचन पोहोचावे, यासाठी घोडाझरीसह सर्व प्रमुख कालव्यांची तातडीने दुरुस्ती करून मजबुतीकरण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.