Election Boycott Chandrapur
चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप–प्रत्यारोप, तिकीट वाटपावरील वाद आणि प्रचाराच्या धामधुमीने वातावरण तापलेले असतानाच, शहरातील एका सामान्य नागरिकाने मात्र निवडणूक प्रक्रियेविरोधात थेट भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेवरील विश्वासार्हतेचा मुद्दा देशपातळीवर चर्चेत असतानाच, चंद्रपूर शहरात ‘सविनय असहकार’ आंदोलनाच्या धर्तीवर निवडणुकीवर बहिष्काराचा फलक झळकला आहे.
चंद्रपूर शहरातील नितीन बनसोड यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास व्यक्त करत, चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीवर उघडपणे बहिष्कार जाहीर केला आहे. शहरातील बाबूपेठ परिसरात राहणारे नितीन बनसोड यांनी आपल्या घरासमोर ठळक फलक लावून या भूमिकेची माहिती नागरिकांसाठी सार्वजनिक केली.
या फलकावर त्यांनी स्पष्ट शब्दांत लिहिले आहे की, “मला निवडणूक आयोग व त्याच्या प्रक्रियेवर विश्वास नसल्यामुळे मी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहभाग घेणार नाही.” यासोबतच, मतदानाच्या प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत, आपण या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
नितीन बनसोड यांच्या या भूमिकेला काही नागरिकांकडून समर्थन तर काहींकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकशाही व्यवस्थेत मतदान हा मूलभूत अधिकार आणि जबाबदारी मानली जात असताना, अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास व्यक्त करत आंदोलनाच्या स्वरूपात बहिष्काराचा फलक लावणे ही चंद्रपूर शहरातील पहिलीच घटना मानली जात आहे.
राजकीय वर्तुळात या घटनेबाबत चर्चा रंगू लागली असून, निवडणूक आयोग किंवा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र लोकशाही प्रक्रियेवरील वाढता अविश्वास आणि नागरिकांच्या संतापाचे हे प्रतीक असल्याचे मत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
चंद्रपूर शहरातील या घटनेने निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आहे. लोकशाहीत मतदाराचा आवाज हा परिवर्तनाचा पाया मानला जातो, मात्र त्या पायावरच प्रश्नचिन्ह उभे राहू लागल्यास व्यवस्थेला आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे मत सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.