

CMC Election Nomination Status
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नामांकन अर्जांच्या छाननीची प्रक्रिया काल (३१ डिसेंबर) पूर्ण झाली. अंतिमरित्या स्वीकारलेल्या ५८४ अर्जांपैकी ५६२ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले, तर २२ उमेदवारांचे अर्ज विविध त्रुटींमुळे अवैध ठरवत बाद करण्यात आले. छाननीनंतर आता वैध उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी ५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून एकूण ५८४ नामनिर्देशन अर्ज अंतिमरित्या स्वीकारण्यात आले होते. त्यांची छाननी काल ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू करण्यात आली. अर्जांची पडताळणी, शपथपत्र, प्रस्तावक-अनुमोदकांची वैधता, कागदपत्रांची पूर्तता व इतर कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आली.
छाननीनंतर ५६२ अर्ज वैध ठरले, तर २२ अर्ज अवैध ठरवत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते रद्द केले.
कार्यालयनिहाय अवैध अर्जांची स्थिती पुढीलप्रमाणे :
◾ निवडणूक निर्णय अधिकारी क्र. १ (प्रभाग १, २ व ५) – ९५ अर्ज स्वीकारले; ११ अर्ज अवैध
◾निवडणूक निर्णय अधिकारी क्र. २ (प्रभाग ३, ४ व ६) – १०९ अर्ज स्वीकारले; ०३ अर्ज अवैध
◾ निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ३ (प्रभाग ७, ८ व ९) – ९६ अर्ज स्वीकारले; ०० अर्ज अवैध
◾ निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ४ (प्रभाग १०, ११, १२ व १५) – १५७ अर्ज स्वीकारले; ०१ अर्ज अवैध
◾निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ५ (प्रभाग १३, १४, १६ व १७) – १२७ अर्ज स्वीकारले; ०७ अर्ज अवैध
छाननीनंतर उमेदवारी माघारी घेण्याची प्रक्रिया उद्या ०२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पार पडणार आहे. त्यानंतर ०३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून निवडणूक चिन्ह वाटप केले जाईल आणि त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या या टप्प्यामुळे राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचे पुढील गणित स्पष्ट होणार असून आता सर्वांचे लक्ष उमेदवारी माघारी व चिन्ह वाटपाकडे लागले आहे. चंद्रपूर मनपा निवडणुकीत यंदा मोठ्या प्रमाणात नामांकन दाखल झाल्याने राजकीय स्पर्धा चुरशीची बनली आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्याने निवडणूक रिंगणातील चित्र आता अंतिम टप्प्यात स्पष्ट होणार आहे.