चंद्रपूर

Illegal mining Chandrapur | खाणीकर्म विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये, महसूल प्रशासन मात्र अजूनही शांत?

गडचांदूर येथे पहाटे वाळूवाहू वाहनावर कारवाई; पैनगंगा नदीपात्रातील अवैध उत्खननावर गस्त वाढली

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील कारवाही-कोडशी वाळू घाटांवर पोकलेन मशीनच्या सहाय्याने सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाची माहिती पुढारीने समोर आणली. यानंतर अखेर खाणीकर्म विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. विभागाच्या पथकांनी गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सतत गस्त सुरू केली असून अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, पथकांच्या हालचालींमुळे घाटांवर रात्री सुरू असलेले उत्खनन काही प्रमाणात थांबल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. “खाणीकर्म विभाग जागा झाला, पण महसूल प्रशासन अजूनही शांत का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. माहितीनुसार, खाणीकर्म विभागाचे पथक मंगळवारपासून कोरपना तालुक्यात विविध भागात फिरत असून संशयित घाटांवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास गडचांदूर परिसरात वाळूने भरलेल्या एका वाहनावर पथकाने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

याआधी पैनगंगा नदीपात्रात थेट पोकलेन मशीन उतरवून मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असल्याची बाब समोर आली होती. घाटांचे अधिकृत मोजमाप आणि मूल्यांकन ज्या ठिकाणी करण्यात आले होते, त्या भागाऐवजी नदीच्या इतरच भागात उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. तसेच काही ठिकाणी ‘टोकन’ पद्धतीने वाहनांना मोकळीक देत अवैध उत्खननाला पाठबळ दिले जात असल्याची चर्चाही परिसरात रंगली होती.

दरम्यान, खाणीकर्म विभागाने हालचाली सुरू केल्या असल्या तरी स्थानिक महसूल प्रशासन मात्र अद्याप निष्क्रिय असल्याचे चित्र दिसत आहे. अवैध उत्खनन रोखण्याची जबाबदारी महसूल विभागावर असतानाही स्थानिक स्तरावर कोणतीही मोठी कारवाई झालेली दिसून आलेली नाही. त्यामुळे “खाणीकर्म विभाग जागा झाला, पण महसूल प्रशासन अजूनही शांत का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या मते, नदीपात्रातील अनियंत्रित उत्खननामुळे पैनगंगा नदीचा नैसर्गिक समतोल धोक्यात आला असून भविष्यात भूजल पातळी घटण्याची शक्यता आहे. यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि परिसरातील जलस्रोतांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, वाळू वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था होत असून नागरिकांना धूळ आणि अपघाताच्या धोक्यालाही सामोरे जावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून महसूल, खाणीकर्म आणि पोलिस विभागाच्या माध्यमातून अवैध उत्खननावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पथक येण्यापूर्वीच रेतीमाफियांना खबर कशी?

पुढारीने पैनगंगा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा खाणीकर्म विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये आला आहे. बुधवारी खाणीकर्म विभागाचे पथक कोरपना तालुक्यातील कोडशी आणि कारवाही घाट परिसरात दाखल होणार असल्याची माहिती होती. मात्र, विशेष बाब म्हणजे पथक पोहोचण्यापूर्वीच संबंधित घाटांवरील अवैध उत्खनन अचानक बंद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे खाणीकर्म विभागाच्या हालचालींची माहिती रेतीमाफियांपर्यंत नेमकी कोण पोहोचवत आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

महसूल, पोलीस प्रशासना रेती माफियांशी संबंध; संशय व्यक्त

स्थानिकांमध्ये आता महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही व्यक्तींचा रेती माफियांशी संबंध आहे का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. कारण खाणीकर्म विभागाचे पथक अनेकदा कोणालाही पूर्वकल्पना न देता अचानक धाड टाकत असते. मात्र, तरीही पथक घाटावर पोहोचण्यापूर्वीच उत्खनन थांबवले जाते आणि यंत्रसामग्री गायब होत असल्याने ‘इनसाइड माहिती’ पुरवली जात असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे अवैध रेती व्यवसायाला प्रशासनातीलच काही घटकांकडून अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याचा आरोप होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT