

पुणतांबा: येथील गोदावरी नदीपात्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातही यंदा नदीपात्रात काहीसा पाणीसाठा आहे. त्यामुळे परिसरातील जनावरांची तहान भागत आहे. तसेच गावातील पाणी टंचाईवर दिलासा म्हणून महिलांना कपडे धुण्यासाठी नदीतील पाणी उपयोगी पडत आहे.
गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे गोदापात्रात फेब्रुवारी पर्यंत चांगला पाणीसाठा होता. मात्र, उन्हाची वाढती तीव्रता व पिकांसाठी पाण्याची होणाऱ्या उपशामुळे पात्रातील पाणी कमी होत असून वसंत बंधाऱ्याखालील नदीपात्र कोरडे ठाक पडले आहे. परिणामी, संत चांगदेव महाराज मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक व दशक्रिया विधी कार्यक्रमाला टँकरद्वारे पाणी आणावे लागत आहे.
मात्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावरील नदीपात्रात मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातही यंदा नदीपात्रात चांगला पाणीसाठा आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस सुरू झाल्यास पाण्यास पाणी मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. होळकर घाट व नदीपात्राच्या पश्चिम भागात मोठा पाणीसाठा आहे. त्यामुळे टंचाई काळात नदीपात्रातील असलेल्या पाण्यामुळे पाणी वापरण्यासाठी महिलांना मोठा दिलासा मिळत आहे.
त्यामुळे जनावरांची तहान भागत आहे. दरम्यान, गोदावरी उजव्या कालव्याचे आवर्तन लांबल्याने नागरिकांना गेल्या 15 दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. गुरुवारी आवर्तनाचे पाणी येथे पोहोचून साठवण तलाव भरल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. पिण्यासाठी विकत पाणी :सहा महिन्यात जलशुद्धीकरण यंत्रणेचे काम पूर्ण करण्याचा कालावधी होता.
मात्र, दोन वर्षापासून काम सुरू असून याबाबत अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. शुद्ध पाणीपुरवठा कधी? : गेल्या अनेक वर्षापासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण यंत्रणेचे काम केव्हा पूर्ण होणार. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा कधी होईल आणि विकतच्या पाण्यापासून सुटका कधी होणार, असा प्रश्न पुणतांबेकरांना पडला आहे.