Melghat Tigress Release Pudhari
चंद्रपूर

Melghat Tigress Release | चंद्रपुरातील नरभक्षक वाघिण परतवाड्यात, मेळघाटात सोडण्याच्या चर्चेने स्थानिक नागरिक भयभीत

सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील जंगलात चार महिला वाघिणीच्या हल्ल्यात ठार

पुढारी वृत्तसेवा

Human Wildlife Conflict Maharashtra

अमरावती : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील जंगलात २२ मे रोजी तेंदूपत्ता संकलनाचे काम करत असलेल्या चार ग्रामीण महिलांना एका नरभक्षक वाघिणीने अचानक हल्ला करून जागीच ठार केले होते. या भयंकर घटनेनंतर सिंदेवाही परिसरात भीतीचे प्रचंड सावट पसरले होते.

वन विभागाने या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी तातडीने युद्धपातळीवर विशेष मोहीम हाती घेतली. ज्या भागात वाघिणीचा वावर होता, तिथे चार मोठे पिंजरे, वीस स्वयंचलित कॅमेरे आणि हालचाली टिपणारे थेट प्रक्षेपण करणारे विशेष कॅमेरे लावण्यात आले होते. अखेर २४ मे रोजी वन विभागाच्या शोध पथकाला या वाघिणीला गुंगीचे औषध देऊन सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश आले.

जेरबंद केल्यानंतर या हिंस्त्र वाघिणीला वन विभागाने अमरावतीतील परतवाडा येथे आणले आहे, ज्यामुळे संपूर्ण परतवाडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यासोबतच अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरातून पकडलेल्या एका लहान मादी बिबट्यालाही उपचारासाठी आणि देखभालीसाठी परतवाडा येथे आणण्यात आले आहे. वन विभाग सध्या या दोन्ही वन्यजीवांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

चार निष्पाप महिलांचा जीव घेणारी ही वाघिणी परतवाड्यात आणल्यामुळे आधीच लोकांची झोप उडाली असताना, आता तिला मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभागाच्या घनदाट जंगलात सोडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा परिसरात पसरली आहे. या चर्चेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परतवाडा वन्यजीव विभागाचे सहायक वनरक्षक विक्रम शिंदे यांनी यासंदर्भात सांगितले की, वाघिणीला सध्या परतवाडा येथे आणले असले तरी तिला कायमस्वरूपी कुठे ठेवले जाईल, याबद्दल अद्याप कोणताही ठोस आणि अंतिम निर्णय झालेला नाही. तसेच तिला मेळघाटातील जंगलात सोडण्याच्या सुरू असलेल्या चर्चांना वन विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सध्या दोन्ही वन्यजीवांना घेऊन पुढील काय कारवाई करायची आणि त्यांना कुठे ठेवायचे यावर गांभीर्याने विचार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT