चंद्रपूर : देशी बनावटीचे अग्निशस्त्र, मॅगझीन व जिवंत काडतुसेसह एका व्यक्तीला सोमवारी (दि.१) पोलिसांनी अटक केली. ही कारवाई जिल्ह्यातील मुल पोलिस स्टेशन अंतर्गत डिबी पथकाने केली. गौरव नितीन नरूले (वय २६, रा. वार्ड क्र. १२, मुल, ता. मुल, जि. चंद्रपूर) असे या संशयिताचे नाव असून तो बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी पोलिस स्टेशन मुल येथील डिबी पथक पेट्रोलिंग करत असताना मुल ते ताडाळा रोडवरील महाबिज केंद्राजवळ एक व्यक्ती संशयितरित्या मोटारसायकलसह आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी पिस्तुलासह त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसे, दोन मॅगझीन, मोबाईल व मोटारसायकल असा एकूण १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरोधात मूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार आत्राम, पोलिस उपनिरीक्षक भाऊराव बोरकर, जमीर खान पठाण, भोजराज मुंडरे, चिमाजी देवकते, नरेश कोडापे, पंकज बगडे व शंकर बोरसरे यांनी केली.