Chandrapur News file photo
चंद्रपूर

Chandrapur News : "सावकारांच्या फाशात अडकलो, आयुष्य उद्ध्वस्त झालं”; बापाचा टाहो, चंद्रपूरमधील ही घटना वाचून अंगावर काटा येईल

Crime News: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील अवैध सावकारी प्रकरण आता केवळ कायदेशीर बाब न राहता मानवी वेदनांची भयावह कथा बनत चालली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur News

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील अवैध सावकारी प्रकरण आता केवळ कायदेशीर बाब न राहता मानवी वेदनांची भयावह कथा बनत चालली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पीडित शेतकरी रोशन कुळे यांच्या कुटुंबाने काय भोगले, याचे विदारक चित्र त्यांचे वडील शिवदास कुळे यांनी दिलेल्या संतापजनक आणि क्लेशदायक प्रतिक्रियेतून समोर आले आहे. सावकारांच्या धमक्या, मारहाण, आर्थिक लुट आणि शेवटी कुटुंबाचा कणा मोडणारा संघर्ष या सगळ्यांनी एका सुखी कुटुंबाचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झाले, हे या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले आहे.

पीडित शेतकरी रोशन कुळे यांच्या वडिलांनी सांगितले की, कर्ज व त्यावर चढलेल्या अवाजवी व्याजाची रक्कम वेळेवर न दिल्याने सावकारांची टोळी वारंवार गावात आणि थेट घरी यायची. या टोळीने घरात येऊन दहशत माजवत रोशन याला वारंवार मारहाण केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. “घरातील कुटुंबियांना होणारा त्रास आणि वेदना शब्दांत सांगता येत नाहीत,” असे त्यांनी म्हटले आहे.

कुळे कुटुंबाकडे दुभती जनावरे होती आणि त्यावर दुधाचा व्यवसाय सुरू होता. मात्र कोरोना काळात दुधाच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला आणि व्यवसाय ठप्प झाला. परिस्थिती थोडी सावरते न सावरते तोच जनावरांवर ‘लंपी’ रोगाचा प्रादुर्भाव झाला. उपचारासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. तीच आमची सर्वात मोठी चूक ठरली, असे ते म्हणाले.

सावकारांनी कर्जावर प्रचंड व्याज आकारले. व्याजावर व्याज चढत गेले आणि रक्कम वाढतच गेली. पैसे खंडाचे नव्हते, पण सावकार थांबत नव्हते. आतापर्यंत आम्ही ७४ लाखांपेक्षा जास्त रक्कम सावकारांना दिली आहे, असा धक्कादायक दावा त्यांनी केला. ही रक्कम स्वतःकडील पैशांतून तसेच नातेवाईकांकडून पैसे घेऊन दिल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केल्याचे ते म्हणाले. कर्जावरील व्याज फेडता फेडता कुटुंबाचा आर्थिक आधारच हिरावून गेला. आता आमची अवस्था फारच वाईट आहे. जीवन जगण्यासाठी काहीही आधार उरलेला नाही. सोनं-नाणं सगळं गेलं, असे सांगताना त्यांच्या शब्दांत प्रचंड वेदना होत्या.

ते स्वतः नोकरीवर होते, परिवार सुखी होता. मात्र डोक्याच्या आजारामुळे घरातील सर्व आर्थिक व्यवहार त्यांनी मुलगा रोशन याच्यावर सोपवले होते. रोशनने प्रामाणिकपणे घराची जबाबदारी सांभाळली, पण सावकारांच्या जाचामुळे तोही पूर्णपणे अडचणीत सापडला. “दुभत्या जनावरांवरील रोगावर उपचार करण्यासाठी कर्ज घेणे हीच आमची सर्वात मोठी चूक ठरली. सावकार इतक्या नीच पातळीवर जातील, घरात येऊन दहशत माजवतील, मुलांवर हात उचलतील, असे कधी वाटले नव्हते,” असे त्यांनी सांगितले. कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळे संपूर्ण कुटुंब कसे बरबाद झाले, याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

वडिलांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे अवैध सावकारी प्रकरणाचे गांभीर्य आणखी गडद  झाले आहे. आमच्या  कुटुंबांवर झालेला हा अमानवी छळ संतापजनक आहे. सावकारांवर कठोर कारवाई व्हावी आणि आमचे गेलेले वैभव परत मिळावे, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT