Wardha River Five Friends Drowned Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Youth Drowning | वर्धा नदीत बुडून पाच मित्रांचा मृत्यू; शेवटची सेल्फी ठरली अखेरची आठवण

घुग्घूसजवळील माथारदेवी परिसरातील हृदयद्रावक घटना; काल बेपत्ता झालेल्या पाचही युवकांचे मृतदेह सापडले, परिसरात शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Ghugus Wardha River Five Friends Drowned

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहरालगतच्या माथारदेवी परिसरात वर्धा नदीत बुडून पाच मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली . पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांचे मृतदेह शोधमोहीमेदरम्यान नदीतून बाहेर काढण्यात आले. नदीत उतरण्यापूर्वी काढलेली त्यांची एकत्रित सेल्फी आता त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी अखेरची आठवण ठरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण घुग्घूस परिसर शोकमग्न झाला आहे.

घुग्घूस शहरातील इंदिरानगर परिसरात राहणारे सम्यक देवराव सोनटक्के (१८), संनी अशोक आस्मपेल्ली (१९), रोहित बाबाराव बोबडे (१९), शिव भास्कर केलझरकर (१९) आणि तन्मय नवनाथ पथाडे (१८) हे पाच मित्र काल दुपारच्या सुमारास माथारदेवी परिसरातील वर्धा नदीकाठी पोहण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली.

शोधादरम्यान नदीकाठी युवकांचे कपडे, चप्पल आणि मोबाईल फोन आढळून आले. यामुळे ते नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथक, बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्रभर शोधमोहीम राबविण्यात आली.

आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथकाने नदीच्या खोल भागात शोध घेतला असता एकामागून एक पाचही युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह सापडताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अनेक नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते.

या घटनेतील सर्वात भावनिक बाब म्हणजे नदीत उतरण्यापूर्वी पाचही मित्रांनी एकत्रितपणे काढलेली सेल्फी. आनंदी चेहऱ्याने काढलेला तो फोटो आता त्यांच्या आयुष्यातील शेवटचा फोटो ठरला आहे. ही सेल्फी सोशल मीडियावर आणि स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय बनली असून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारी ठरत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एक युवक बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात इतर मित्रही पाण्यात गेले आणि दुर्दैवाने सर्वजण खोल पाण्यात अडकले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे घुग्घूस शहरासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच परिसरातील पाच तरुण मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने इंदिरानगर परिसरावर शोककळा पसरली आहे. मृत युवकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांकडून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT