Chandrapur News | किडनी विकणारा शेतकरी रोशन कुळे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत!

राजकीय पाठबळामुळे एका सावकाराला संरक्षण?; रोशन कुळे यांचा गंभीर आरोप, ‘आठ लाख रुपयांचे व्यवहार, बँक स्टेटमेंट आणि पावत्या दिल्या, तरी चौकशीही नाही’
Chandrapur News | किडनी विकणारा शेतकरी रोशन कुळे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत!
Chandrapur News | किडनी विकणारा शेतकरी रोशन कुळे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत! Pudhari
Published on
Updated on

चंद्रपूर : सावकारीच्या विळख्यात अडकून कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकावी लागलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मींथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांचा न्यायासाठीचा संघर्ष अद्याप सुरूच आहे. किडनी विक्री प्रकरणात आतापर्यंत सहा जणांवर कारवाई झाली असली, तरी तक्रारीत नाव असलेल्या एका सावकारावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने रोशन कुळे यांनी पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित सावकाराला राजकीय पाठबळ असल्यामुळे त्याला जाणीवपूर्वक वाचवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

किडनी विक्री प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या रोशन कुळे यांनी आता तपास प्रक्रियेतील कथित दुहेरी निकषांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “ज्या व्यक्तीला मी लाखो रुपये दिल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत, त्याला अद्याप चौकशीसाठीही बोलावले गेले नाही,” असा आरोप करत त्यांनी तपासाची दिशा आणि निष्पक्षतेबाबत शंका व्यक्त केली आहे.

सहा जणांवर कारवाई, पण एक सावकार अद्याप तपासाबाहेर

रोशन कुळे यांनी सांगितले की, किडनी विक्री आणि सावकारी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांविरुद्ध कारवाई केली आहे. मात्र, दिवाकर निकुरे नावाच्या सावकाराविरुद्ध अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, त्याला चौकशीसाठीही बोलावण्यात आले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

रोशन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दिवाकर निकुरे याला सुमारे आठ लाख रुपये दिले असून त्यासंदर्भातील बँक व्यवहार, बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली आहेत. तरीही तपास यंत्रणा त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याने संशय निर्माण होत आहे.

‘काळा पैसा पांढरा करण्याचे काम करतो’

रोशन कुळे यांनी दिवाकर निकुरे याच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहेत. “तो केवळ सावकार नसून काळा पैसा पांढरा करून देण्याचे काम करतो. माझ्या शेतजमिनीच्या व्यवहारातही त्याचा सहभाग होता. जबरदस्तीने बळकावलेल्या शेताचे पैसे मी त्याच्या नावाने बँकेत जमा केले असून, त्याच्या पावत्या माझ्याकडे आहेत,” असा दावा त्यांनी केला आहे. या सर्व बाबींची माहिती आणि पुरावे पोलिसांना देऊनही संबंधित व्यक्तीची चौकशी होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय पाठबळामुळे संरक्षण?

दिवाकर निकुरे हा एका राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्ता असल्याचा दावा करत रोशन कुळे यांनी त्यालाच संरक्षण दिले जात असल्याचा आरोप केला आहे. “इतर आरोपींवर वेगाने कारवाई झाली, मग याच व्यक्तीबाबत पोलिसांची भूमिका वेगळी का आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रोशन यांच्या मते, जर तपास निष्पक्ष असेल तर सर्व संबंधितांची समान चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र, एका व्यक्तीला तपासाच्या कक्षेबाहेर ठेवले जात असल्याने संपूर्ण तपास प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘माझा लढा सुरूच राहील’

या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार रोशन कुळे यांनी व्यक्त केला आहे. “सावकारीमुळे मला स्वतःची किडनी विकावी लागली. माझ्यासारख्या इतर शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ नये म्हणून मी हा लढा लढत आहे. कोणालाही वाचवले जाऊ नये आणि सर्व दोषींवर कारवाई व्हावी,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, या आरोपांबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल कचोरे यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता, “केवळ बँकेचे व्यवहार झाले म्हणून एखादी व्यक्ती आरोपी ठरत नाही. तपासात उपलब्ध पुरावे आणि कायदेशीर बाबींच्या आधारेच कारवाई केली जाते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, याच प्रकरणात इतर सावकारांवर बँक व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाणीच्या आधारे कारवाई करण्यात आली असल्याने, “मग दिवाकर निकुरे यांच्याबाबत वेगळे निकष का?” हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.

किडनी विक्री, सावकारी, आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट आणि आता तपासातील कथित विसंगती या सर्व कारणांमुळे रोशन कुळे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, संबंधित सावकाराविरोधात पुढे काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news