वाघाच्या हल्ल्यात चार शेतकरी जखमी झाले 
चंद्रपूर

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात चार शेतकरी गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील उरकुडपार, गरडापार शेत शिवारात रोवणीसाठी गेलेल्या चार शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि.४)दुपारी बाराच्या सुमारास घडली. जखमींना स्थानिक स्तरावर उपचार करून नागपूरला उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या घटनेने शेतकरी, शेतमजूर भयभीत झाले आहे.

तालुक्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला शेती लागून असल्याने मानव व वण्यप्राणी संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (रविवारी) दुपारच्या सुमारास गरडापार शेतशिवारात पीकरोवणी सुरू असताना जंगलालगत दबा धरून असलेल्या वाघाने गरडापार येथील विजय नन्नावरे यांच्या शेतात धान रोवण्याकरीता गेलेला शेतमजुर कवडू सावसाकडे (वय ५५, रा. किटाडी मक्ता ) यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. शेतात रोवणे सुरु असल्याने शेत मजुरांनी ओरडाओरड केल्यामुळे वाघ पळाला. त्यांनंतर दुसऱ्या शेतात असलेले बालाजी नन्नावरे गरडापार (वय ४८ ) यास जखमी केले. दोघांनाही उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णांलयात दाखल करण्यात आले.

गरडापार येथे शेतकरी व शेत मजुरांचा गलका झाल्याने तिथूनही वाघ पळाला. त्यानंतर उरकुडपार शेत शिवारात वन विभागाच्या नर्सरीमध्ये काम करणाऱ्या बाबाराव दडमल (वय ४८, रा.उरकुडपार) या वनमजुराला जखमी केले. बाबाराव यांनाही चिमूर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. त्यानंतर उरकुडापार निवासी दामा नन्नावरे (वय ६०) यांच्यावरही वाघाने हल्ला करून त्यांना जखमी केले.

घटनेची घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर प्रादेशिक वनपरीक्षेत्र अधिकारी किशोर देऊरकर, वनक्षेत्र अधिकारी लोखंडे व कर्मचाऱ्यांनी भेट दिली. जखमींना वनविभागाकडून आर्थिक मदत देण्यात आली. एकाच दिवशी शेतात काम करणाऱ्या चार शेतमजुरांवर वाघाने हल्ला केल्याने शेतकरी, शेतमजूर भयभीत झाले आहेत. वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT