Gold theft  (Pudhari File Photo)
चंद्रपूर

Warora gold theft case| हळद-पाण्याच्या प्रयोगातून सोन्याची चैन लंपास; वरोऱ्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

चांदी, तांबे व पितळेची भांडी स्वच्छ करण्याचे पावडर असल्याचे सांगत काही वस्तू स्वच्छ करून दाखवल्याची माहिती समोर आली आहे

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : वरोरा शहरातील महाबँक कॉलनी परिसरात सोन्याची चैन स्वच्छ करून नवीनसारखी करून देण्याचे आमिष दाखवत, दोन अज्ञात भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नथ्थु साधोजी दडमल (वय ६२) हे आपल्या घरी असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. त्यांनी चांदी, तांबे व पितळेची भांडी स्वच्छ करण्याचे पावडर असल्याचे सांगत काही वस्तू स्वच्छ करून दाखवल्या. त्यामुळे तक्रारदारांचा त्यांच्यावर विश्वास बसला. यानंतर आरोपींनी तक्रारदारांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन स्वच्छ करून देण्याचे सांगितले. त्यांनी हळद व पाणी टाकलेल्या स्टीलच्या डब्यात चैन ठेवून ती गॅसवर गरम करण्यास सांगितले. त्यानंतर “रजिस्टर घेऊन येतो” असे सांगत दोघेही तेथून पसार झाले.

काही वेळानंतर संशय आल्याने तक्रारदारांनी डबा उघडून पाहिला असता त्यामधील सोन्याची चैन गायब असल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वरोरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT