Dhule Crime : धुळ्यात महिलांची मंगळसूत्रे लांबवणारी टोळी गजाआड; गुन्हे शाखेकडून चौघांना मुद्देमालासह अटक

Dhule Crime : धुळ्यात महिलांची मंगळसूत्रे लांबवणारी टोळी गजाआड; गुन्हे शाखेकडून चौघांना मुद्देमालासह अटक
Published on
Updated on

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथे रात्रीच्या वेळी अंगणात झोपलेल्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह जेरबंद केले आहे. या चोरट्यांची प्राथमिक चौकशी केली असता, त्यांनी आणखी तीन ठिकाणी अशाच प्रकारे चोऱ्या केल्याची कबुली दिली असून चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील रहिवासी सतिष सुभाष पाटील यांच्या आई रात्रीच्या वेळी घराबाहेर अंगणात खाटेवर झोपलेल्या होत्या. साधारण रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून काढले आणि दुचाकीवरून पळ काढला.

या घटनेप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार हे करत होते. तपास सुरू असतानाच त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मुंबई-आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ वैभव चतुर बोरसे, मुस्तफा जुमा पिंजारी, धिरज बालूसिंग गिरासे आणि भूषण रमेश पाटील हे चार संशयित तरुण उभे आहेत. तसेच त्यांच्या ताब्यात दोन दुचाकी असून, या गाड्यांचा वापर त्यांनी मंगळसूत्र चोरी करताना केला आहे.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पवार यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे व अंमलदारांचे एक विशेष पथक तयार केले. या पथकाला योग्य त्या सूचना व मार्गदर्शन देऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले. या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील सरवड फाटा येथील सर्व्हिस रोडवर सापळा रचून चौघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवून त्यांची प्राथमिक चौकशी केली असता, त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील अमराळे तसेच होळ परिसरात अशाच पद्धतीने महिलांची मंगळसूत्रे चोरी केल्याची कबुली दिली.

या आरोपींकडे पोलिसांनी अधिक तपास केला असता, मुख्य आरोपी वैभव चतुर बोरसे याने त्याचा साथीदार मुस्तफा जुम्मा पिंजारी याच्या मदतीने नवलनगर भागातून एक हिरो कंपनीची मोटरसायकल देखील चोरी केल्याचे मान्य केले. ही चोरीची दुचाकी त्यांनी धुळे शहरातील गोंदूर रोड परिसरात लपवून ठेवली होती, जी पोलिसांनी आरोपींच्या सांगण्यावरून जप्त केली आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून चोरीची मंगळसूत्रे आणि गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी असा सर्व मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news