चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची हारजीत लावून जुगार खेळण्याचे प्रकार वाढत असतानाच, घुग्घुस पोलिसांनी आज शुक्रवारी (९ जानेवारी २०२६) रोजी मौजा अंतुर्ला शेतशिवारात धडक छापा टाकून अवैध जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईमुळे अवैध जुगार व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
आज शुक्रवारी रोजी पोलीस स्टेशन घुग्घुस पथकाला मौजा अंतुर्ला शेतशिवारात कोंबड्यांची झुंज लावून त्यावर हारजीतचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा होताच पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. पोलिसांनी आरोपी सचिन महादेव ढवळे (वय ३६) रा. ताडाळी, प्रविण सुरेश भोयर (वय ३०) रा. शेनगाव,यांना जुगार खेळताना ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २ नग जिवंत कोंबडे (अंदाजे किंमत १००० रु.), अंगझडतीत नगदी २५०० रु., तसेच २ मोबाईल (अंदाजे किंमत २४,५०० रु.), असा मिळून एकूण २८,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध अप.क्र. ०३/२०२६, कलम १२(अ) जुगार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले (चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोनि प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वात सपोनि सचिन तायवाडे, पोहवा अनिल, पोहवा राकेश, पोहवा संजय, पोअं रविंद्र, पोअं नितीन, पोअं महेश, पोअं रविंद्र (सर्व पोस्टे घुग्घुस) यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.