Pratibha Dhanorkar Vijay Wadettiwar Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Congress |चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी टोकाला : महापालिका गटनोंदणीवरून संघर्ष

आयुक्तांवर भाजपाच्या दबावाचा वडेट्टीवारांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Municipal Corporation

चंद्रपूर : चंद्रपूर शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली असून, महापालिकेतील काँग्रेस गटनेता निवडीच्या मुद्द्यावरून खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. गटनोंदणीच्या प्रक्रियेत प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबावरून आमदार विजय वडेट्टीवार यांनी थेट विभागीय आयुक्तांवर भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची निर्णायक बैठक होत असून, या बैठकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेता निवडीवरून काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेली गटबाजी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. याआधी पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करत या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या बैठकीनंतरही मतभेद कायम राहिले.

दरम्यान, 23 जानेवारी रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या समर्थक 13 नगरसेवकांसह नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत गटाची नोंदणी केली. या नोंदणीला आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटाने तीव्र आक्षेप घेतला होता. वडेट्टीवार गटाकडून आपल्याकडे 18 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर, वडेट्टीवार गटातील सर्व नगरसेवक 2 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीसाठी दाखल झाले होते. मात्र, विभागीय आयुक्तांनी हे प्रकरण नगरविकास विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगत, गट नोंदणीबाबतचा अंतिम निर्णय प्रशासन स्तरावर घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

या निर्णयावर आमदार विजय वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विभागीय आयुक्तांवर भाजपाचा दबाव असून, भाजपाच्या इशाऱ्यावरच आयुक्त काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भाजपाच्या दबावामुळेच काँग्रेस गटनोंदणीचा निर्णय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच, “मी स्वतः विभागीय आयुक्त कार्यालयात जाणार असून, वेळ पडल्यास आंदोलनही करणार,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्ली येथे काँग्रेस पक्षाची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित राहणार आहेत. चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT