बंदराचा पाठलाग करत विद्युत डीपीवर चढलेल्या मादी बिबट्याला विजेचा जबर धक्का बसला  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Leopard Death | शिकार अन् जगण्याच्या धडपडीत दोघांचाही अंत; माकडामागे धावलेल्या बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

जीव वाचविण्यासाठी बंदराची धडपड, भूक भागविण्यासाठी बिबट्याची झेप; वगाडपेठ येथे डीपीवरील विद्युत प्रवाहाने दोघांचाही घेतला बळी

पुढारी वृत्तसेवा

Chimur Forest Range Leopard Death

चंद्रपूर : एकीकडे जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावणारे बंदर आणि दुसरीकडे पोटाची भूक भागविण्यासाठी त्याच्या मागावर असलेला बिबट्या... निसर्गातील शिकारी आणि भक्ष्याचा हा पाठलाग अखेर दोघांसाठीही जीवघेणा ठरला. बंदराचा पाठलाग करत विद्युत डीपीवर चढलेल्या मादी बिबट्याला विजेचा जबर धक्का बसला आणि क्षणातच तिच्यासह बंदराचाही मृत्यू झाला. चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर उपवनक्षेत्रांतर्गत वगाडपेठ परिसरात घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

पिंपळगाव येथील शेतकरी महादेव धारणे यांच्या शेतात विद्युत डीपी आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास या डीपीवर एक बंदर असल्याचे दिसून आले होते. बंदराच्या मागावर असलेली मादी बिबट्याही शिकारीच्या प्रयत्नात डीपीवर चढली. याचवेळी विद्युत प्रवाहाचा स्पर्श झाल्याने बिबट्या आणि बंदर या दोघांचाही मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

सोमवारी सकाळी महादेव धारणे शेतात गेले असता डीपीजवळ बिबट्या आणि बंदर मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी तत्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकर, वनपाल राजेंद्र मेश्राम, वनरक्षक कालिदास गायकवाड आणि वनमजूर घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृत प्राण्यांचे मृतदेह खडसंगी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले.

ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, सहायक उपवनसंरक्षक महेश गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकर, पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉ. रमेश कुमार ओव्हाळ, शंकरपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील, चैतन्य सोनुले, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, वनपाल राजेंद्र मेश्राम आणि वनरक्षक कालिदास गायकवाड यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नियमानुसार दहन करण्यात आले. दोन्ही मृतदेहाना दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे ही घटना दोन तीन दिवसांपूर्वीची असावी अशी शंका आहे.

नियतीने एकाच क्षणी थांबविला पाठलाग

स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बंदर धावत होते, तर पोटाची भूक भागविण्यासाठी बिबट्या त्याचा पाठलाग करत होता. जंगलातील अन्नसाखळीचा हा नैसर्गिक संघर्ष सुरू असतानाच विजेच्या प्रवाहाने दोघांचाही प्रवास एकाच क्षणी थांबविला. काही क्षणांपूर्वी एक जीव वाचविण्यासाठी तर दुसरा जगण्यासाठी धावत होता; मात्र विद्युत डीपीवरील एका स्पर्शाने शिकारी आणि भक्ष्य दोघांनाही मृत्यूने गाठले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT