

Warora Farmer Death
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील भाटाळा येथील ६३ वर्षीय शेतकरी चिंदू रामचंद्र बावणे यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. मागील शुक्रवारी विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी (दि.२९) त्यांचा मृत्यू झाला. यंदाच्या अल्प पावसामुळे शेतीसोबतच मत्स्यपालन आणि शिंगाडा उत्पादनावर परिणाम झाल्याने ते आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
चिंदू रामचंद्र बावणे हे भाटाळा येथील रहिवासी असून त्यांच्याकडे सुमारे दीड एकर शेती होती. शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासोबतच ते तलावात मत्स्यपालन आणि शिंगाड्याची शेतीही करत होते. मात्र, यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने त्यांच्या शेतीचे नुकसान झाले.
अल्प पावसाचा फटका त्यांच्या इतर उत्पन्नाच्या साधनांनाही बसला. तलावात पुरेसे पाणी नसल्याने मत्स्यपालन आणि शिंगाड्याच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम झाला. शेतीसह पूरक व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने बावणे आर्थिक विवंचनेत होते, असे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मागील शुक्रवारी बावणे यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून भाटाळा गावात हळहळ व्यक्त होत आहे.