उषा गुरुनुले Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack | पतीसमोरच वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; मृतदेह शवविच्छेदनासाठी नेणारे वाहन अडविले

चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Palasgaon Forest Woman Killed By Tiger

चंद्रपूर : धान पिकाला पाणी देण्यासाठी पतीसोबत शेतात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिचा जीव घेतल्याची दुर्दैवी घटना चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रात शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) घडली. उषा अंकुश गुरुनुले (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून, मृत महिलेच्या कुटुंबातील मुलांना नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाणारे वाहन अडविले. मागणी मान्य झाल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पतीच्या डोळ्यांदेखत वाघाचा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, उषा गुरुनुले या सोयाबीन कापणीचे काम आटोपून घरी आल्यानंतर पती अंकुश गुरुनुले यांच्यासोबत धान पिकाला पाणी देण्यासाठी जंगलालगतच्या शेतात गेल्या होत्या. पती डिझेल इंजिनजवळ पाण्याची व्यवस्था करीत असताना उषा या शेतातील तण काढण्याचे काम करीत होत्या. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने त्यांना पकडून जवळच्या जंगलाच्या दिशेने ओढत नेले. पतीने आरडाओरड केली; मात्र वाघाने मानेचा चावा घेतल्याने उषा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५५९, पीएफ १००० परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

नोकरीच्या मागणीसाठी मृतदेह नेणारे वाहन अडविले

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, मृत महिलेच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी कुटुंबातील मुलांना नोकरी देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ही मागणी मान्य होईपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी नेऊ देणार नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी वाहन अडविले.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव जात असताना बाधित कुटुंबीयांना शासन आणि वनविभागाकडून ठोस मदत मिळावी, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेतकरी-शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पळसगाव परिसरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याने जंगलालगतच्या शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतीच्या कामांसाठी शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांच्या वावरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

वनविभागाने परिसरात गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, मृत महिलेच्या कुटुंबातील मुलांना नोकरी देण्याच्या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते आणि ग्रामस्थांची समजूत काढून पुढील प्रक्रिया कशी पार पाडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT