Chandrapur Accident | कारची सायकलला समोरासमोर धडक; सायकलस्वार ठार, कार पलटी!

गोविंदपूर बायपासवरील भीषण अपघात, मद्यप्राशन करून वाहन चालविल्याच्या आरोपावरून कारचालकाला अटक
Chandrapur Accident
मृत हरिदास दशरथ चंदनखेडे
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : शेताला पाणी देऊन सायकलने घरी परतणाऱ्या ६० वर्षीय शेतकऱ्याला भरधाव स्विफ्ट कारने समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सायकलस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर धडकेनंतर कार रस्त्यावर पलटी झाली. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तळोधी (बा.)

नागभीड  मार्गावरील तळोधी बा.  येथील गोविंदपूर बायपासवर घडली. हरिदास दशरथ चंदनखेडे (वय ६०) असे मृताचे नाव असून, मद्यप्राशन करून वाहन चालविल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.

तळोधी बा. परिसरात पाण्याची टंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेताला पाणी देण्यासाठी गेलेले हरिदास चंदनखेडे रात्री सायकलने घरी परतत होते. दरम्यान, सिंदेवाही येथून वडसाला जाणाऱ्या एमएच ३३ व्ही १७९७ क्रमांकाच्या स्विफ्ट कारने गोविंदपूर बायपास मार्गावर त्यांच्या सायकलला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की कार रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चंदनखेडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच तळोधी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी कारचालक तुषार संजय मैंद (वय ३२) रा. मधुबन कॉलनी, वडसा याला अटक करण्यात आली आहे. या अपघातप्रकरणी गुन्हा क्रमांक २६४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ व १८५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news