

Chandrapur Drought Mitigation Plan
चंद्रपूर : खरीप हंगामातील अपुऱ्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि गरजू कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच जलसंधारण, सिंचन क्षमता वाढ, वृक्षलागवड, चारा निर्मिती आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यावर विशेष भर देण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळग्रस्त भागांमध्ये रोजगारनिर्मितीला प्राधान्य देत जलसंधारण व ग्रामीण पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. ‘विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका हमी अभियान (व्हीबीजी-राम-जी)’ अंतर्गत 28 हजार 688 विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे.
जलसंधारण व कृषी विकासाच्या 28688 कामांचे नियोजन : सन 2026-27 च्या वार्षिक नियोजन आराखड्यामध्ये विविध कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये 899 मामा तलाव खोलीकरण, 1620 बोडी खोलीकरण, 2375 नाला खोलीकरण, 2438 शेततळे, 834 बंधारे बांधकाम व गाळ काढणे, 189 रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि 16356 सिंचन विहिरींच्या कामांचा समावेश आहे. याशिवाय 2456 वृक्ष लागवड, 712 फुलशेती, 747 गवत लागवड आणि 62 सलग समतल चर (सीसीटी) अशा विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांमुळे पाणी साठवण क्षमता वाढविणे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारणे, जमिनीतील ओलावा टिकविणे आणि ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे.
825 ग्रामपंचायतींमध्ये 82500 जलतारांची कामे : जिल्ह्यातील भूजलपातळी वाढविणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आणि जलस्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी 100 याप्रमाणे एकूण 82500 जलतारांची कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘युक्तधारा’ प्रणालीद्वारे आतापर्यंत 17541 कामे प्रस्तावित करण्यात आली आहे.
विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका हमी अभियान व जिल्हा खनिज विकास निधी यांच्या अभिसरणातून विशेष वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील 45 ग्रामपंचायतींमध्ये स्वस्तिक पॅटर्न वृक्षलागवड, तर 51 ग्रामपंचायतींमध्ये फळबाग लागवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही उपक्रमांतर्गत एकूण 66 हजार रोपांची लागवड करण्याचे नियोजन आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण मजुरांना तातडीने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कामांची पूर्वतयारी केली आहे. त्यानुसार सार्वजनिक स्वरूपाच्या 3521 आणि वैयक्तिक लाभाच्या 6716 अशा एकूण 10237 कामांचा सेल्फ तयार करण्यात आला आहे. सद्यस्थितीत ‘व्हीबीजी-राम-जी’ अंतर्गत जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत 1495 कामे सुरू असून, या कामांवर 3957 मजूर कार्यरत आहेत.
दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण नागरिकांना केवळ तात्पुरता रोजगार उपलब्ध करून देणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता, भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, शेतीची उत्पादकता टिकविणे, सिंचन सुविधा बळकट करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कामांचे नियोजन केल्याचे उपजिल्हाधिकारी (मनरेगा) शुभम दांडेकर यांनी दै. पुढारीशी बोलताना माहिती दिली.