Chichpalli Junona Road Tiger Habitat
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघांच्या वाढत्या वावराने मानव–वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. 27 डिसेंबरला बांबू कटाईचे काम करत असताना दोन बालाघाटी मजुरांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर दुसरीकडे रविवारी ( दि. 28 ) सकाळी चिचपल्ली–जुनोना रोडलगत असलेल्या 4 राहुट्यांमध्ये 31 मजूर मागील 5 दिवसांपासून जंगलालगत, थेट वाघाच्या अधिवास क्षेत्रात मुक्कामी राहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, काल रात्री येथेही वाघाने हजेरी लावली होती, तर त्याआधीच्या रात्रीही वाघाचा वावर मजुरांच्या तळापर्यंत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मामला आणि महादवाडी येथे अधिकृत बांबू कटाई सुरू असताना, शनिवारी दोन मजुरांवर वाघाने अचानक हल्ला केला. यात प्रेमसिंग दुखी उदे आणि बुदशिंग श्यामलाल मडावी या दोन्ही बालाघाट (मध्यप्रदेश) येथील मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वनविभागाने बांबू तोडणीसाठी बालाघाट येथून मजूर बोलावले होते. कटाईचे काम सुरू असताना सुरक्षा उपाय अपुरे असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी चिचपल्ली–जुनोना मार्गालगतच्या जंगल सीमेजवळ असलेल्या 4 राहुट्यांची माहिती पुढे आली. येथे 31 मजूर 5 दिवसांपासून मुक्कामी राहत आहेत. या तात्पुरत्या राहुट्या जंगलालगत, वाघांच्या नैसर्गिक अधिवासात उभारण्यात आल्या असून, मजूर याच तळावरून दररोज बांबू तोडणीसाठी जंगलात प्रवेश करीत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री या मजुरांच्या तळाजवळ वाघ आला होता. त्याआधीही वाघाचा वावर सातत्याने जाणवत असल्याने मजुरांमध्ये दहशत पसरली आहे. राहुट्यांमध्ये राहणाऱ्या मजुरांकडे कोणतीही ठोस संरक्षक व्यवस्था, सुरक्षा कवच किंवा तळ संरक्षणासाठी वनपथक उपलब्ध नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
जंगलालगत, थेट वाघांच्या क्षेत्रात मजुरांचा दीर्घकाळ मुक्काम असणे ही बाब अत्यंत संवेदनशील असून, यातून आणखी मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या मते, वाघाचा अधिवास असलेल्या क्षेत्रात मजुरांचा तळ उभारणे आणि 5 दिवसांहून अधिक मुक्काम करणे हे धोकादायक आहे.
या घटनास्थळी वरिष्ठ वनाधिकारी आणि सुरक्षा पथक पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मजुरांच्या तळावर तातडीने वनरक्षक पथक, लाईट व्यवस्था, अलर्ट सायरन, संरक्षक जाळी, गस्ती वाढवणे आणि मजुरांना सुरक्षित स्थळी हलवणे या उपायांची मागणी केली जात आहे.
“बांबू कटाईसारखे काम जंगलात करणे आवश्यक असले, तरी मजुरांच्या जीवाशी खेळ होऊ नये. ताडोबाच्या बफरमध्ये काम करताना आणि मुक्काम करताना सुरक्षा हा पहिला निकष असायला हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया चिचपल्ली–जुनोना मार्गालगतच्या नागरिकांनी व्यक्त केली.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षभरात मानव–वन्यजीव संघर्षात 47 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद यापूर्वी समोर आली असून, वाघांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याचे वास्तव आहे. यामुळे जंगल सीमेलगत काम करणारे मजूर, शेतकरी आणि ग्रामस्थ सतत धोक्याच्या छायेत आहेत.
सलग दोन हल्ल्यांच्या घटनेनंतर जंगलालगत 31 मजुरांचा मुक्काम ही बाब प्रशासनासमोर मोठे आव्हान उभी करणारी आहे. मजुरांची सुरक्षा, वनक्षेत्रातील कामाचे नियोजन आणि वाघ–मानव संघर्ष कमी करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.