Bramhapuri Health Department Employee Arrested
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. प्रोत्साहन भत्त्याचे बिल मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या तालुका समूह संघटक सुदेश ज्ञानेश्वर महाडोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, ब्रम्हपुरी येथे कार्यरत असलेले तालुका समूह संघटक सुदेश ज्ञानेश्वर महाडोळे (वय ४०) यांनी एका कर्मचाऱ्याकडून प्रोत्साहन भत्त्याचे बिल मंजूर करून दिल्याच्या बदल्यात ५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने सापळा रचत आरोपीला रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे आरोग्य विभागाशी संबंधित विविध कामे करणारे कर्मचारी असून त्यांना शासनाकडून दरमहा १० हजार रुपये मानधन मिळते. माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण मोहिमा, साथीचे व संसर्गजन्य आजार नियंत्रण, विविध बैठका तसेच इतर कामांबाबतचे बिल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून मंजूर करण्यात आले होते. या कामांच्या मोबदल्याची ३३ हजार ६३१ रुपयांची रक्कम तक्रारदारांच्या पोस्ट खात्यात ९ मे २०२६ रोजी जमा झाली होती.
त्यानंतर सुदेश महाडोळे यांनी संबंधित बिलाची अंतिम तपासणी करून ते पुढील स्तरावर पाठविल्यामुळेच बिल मंजूर झाले असल्याचे सांगितले. या बदल्यात त्यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर एसीबीने पंचांसमक्ष मागणीची पडताळणी केली. पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज १० जून रोजी सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी महाडोळे यांनी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
आरोपी सुदेश महाडोळे हे कंत्राटी स्वरूपात तालुका समूह संघटक म्हणून कार्यरत असून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कर्मचाऱ्यांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाई दरम्यान निरीक्षक सचिन धर्मेजवार यांच्यासह हिवराज नेवारे, रविकुमार इंगळे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, मेघा मोहुर्ले, सतीश सिडाम आणि संदीप कौरासे यांचा सहभाग होता