मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.  Pudhari
चंद्रपूर

Vijay Wadettiwar | देश गहाण ठेवण्याचे महापाप भाजप सरकारचे : विजय वडेट्टीवार

ब्रह्मपुरीतील जनआक्रोश महामोर्चात सरकारवर टीका; हजारोंचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

Bramhapuri Congress Jan Akrosh Morcha

चंद्रपूर : केंद्र व राज्य सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे गुरुवारी ब्रह्मपुरी येथे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण येथून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मोर्चाला संबोधित करताना विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. "भाजप सरकारने देश लुटून उद्योगपतींच्या घशात घातला असून देश गहाण ठेवण्याचे महापाप केले आहे," असा आरोप त्यांनी केला. सरकारच्या धोरणांचा लाभ सर्वसामान्यांऐवजी मोजक्या उद्योगपतींना होत असल्याचाही दावा त्यांनी केला.

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण झाल्याचा आरोप केला. शेतकरी कर्जबाजारी असून युवकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनल्याचेही त्यांनी सांगितले.

'लाडकी बहीण' योजनेबाबत बोलताना निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने देण्यात आली; मात्र सत्तेत आल्यानंतर सुमारे एक कोटी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळाला नसल्याचा तसेच कर्जमाफीच्या घोषणांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

राज्यातील विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचाही उल्लेख केला. काँग्रेस सरकारच्या काळात या प्रकल्पासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे सिंचनाला चालना मिळाली होती. मात्र, सध्याच्या सरकारच्या काळात प्रकल्पांची कामे संथ गतीने सुरू असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी सुपीक शेती कमी मोबदल्यात संपादित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

शिक्षण क्षेत्रातील निर्णयांवर टीका करत त्यांनी हजारो शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा दावा केला. तसेच स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेवर आर्थिक भार टाकला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या युवकांवरील लाठीचार्जचा निषेध करत जनतेचा रोष आगामी काळात सरकारला भोगावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनीही सरकारच्या कथित दडपशाही धोरणांवर टीका करत अन्यायाविरोधात एकजूट होण्याचे आवाहन केले. यावेळी विविध मान्यवरांनीही आपली मते व्यक्त केली.

मोर्चानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. महागाईवर नियंत्रण, बेरोजगारांना रोजगार, शेतकऱ्यांना हमीभाव, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना तसेच सर्वसामान्यांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

मोर्चात युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, खेमराज तिडके, हितेंद्र राऊत, प्रभाकर सेलोकर, राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, योगेश मिसार, डॉ. नितीन उराडे, थानेश्वर कायरकर, सोनू नाकतोडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT