

Jankapur Tiger Attack
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील जनकापूर येथे शेतकरी रमेश जयराम काशीवार (वय ५५) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर वनविभागाने वाघाचा माग काढण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. घटनास्थळ व परिसरात ८ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
त्यापैकी २ अत्याधुनिक लाईव्ह कॅमेऱ्यांद्वारे वाघाच्या हालचालींवर चोवीस तास नजर ठेवली जात आहे. याशिवाय १५ वन कर्मचाऱ्यांचे विशेष पथक दिवस-रात्र गस्त घालत असून, वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसविण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
मंगळवारी (दि. ४ ) दुपारी शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या रमेश काशीवार यांच्यावर जंगलालगतच्या शेतात वाघाने अचानक हल्ला करून त्यांचा बळी घेतला. या घटनेनंतर जनकापूरसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत असून, नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
नागभीडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी सांगितले की, वाघाच्या हालचालींचा सातत्याने मागोवा घेतला जात आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांमधून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण केले जात असून, लाईव्ह कॅमेऱ्यांद्वारे प्रत्यक्ष हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे. परिसरात तैनात करण्यात आलेले वन कर्मचाऱ्यांचे पथक गस्त घालत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. जंगलालगतच्या भागात एकटे न जाण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी मिळावी म्हणून वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच तातडीने पिंजरा बसवून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रमेश काशीवार यांच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी वाघाला त्वरित जेरबंद करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
जनकापूर परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. शेतात कामासाठी जाणाऱ्या नागरिकांनी गटाने जावे, सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा जंगलालगतच्या भागात जाणे टाळावे आणि वाघ दिसल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.