Chandrapur Bor Rith Village Claim Pudhari
चंद्रपूर

Chandrapur History Discovery | चंद्रपूरचे मूळ गाव ‘बोर रिठ’ असल्याचा दावा; संगमाजवळ १० हजार वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीचे पुरावे

इराई-झरपट नदी संगम परिसरात पाषाणयुगीन अवजारे, सातवाहन, वाकाटक व यादवकालीन अवशेषांचा शोध

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Bor Rith Village Claim

चंद्रपूर : चंद्रपूर शहराचा इतिहास गोंड राजांपासून सुरू होतो, अशी सर्वसाधारण धारणा असली तरी त्यापूर्वी येथे हजारो वर्षांपासून मानवी वस्ती अस्तित्वात होती, असा महत्त्वपूर्ण दावा इतिहास अभ्यासक व संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. इराई व झरपट नद्यांच्या संगमाजवळील ‘बोर रिठ’ या परिसरात पाषाणयुगापासून ते सातवाहन, वाकाटक आणि यादवकालापर्यंतच्या मानवी वस्तीचे पुरावे आढळल्याचे त्यांनी सांगितले आहे. या संशोधनामुळे चंद्रपूरच्या प्राचीन इतिहासावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संगम परिसरात प्राचीन गावाचा शोध

चंद्रपूर शहरालगत इराई आणि झरपट नद्यांच्या संगमाजवळील पुरक्षेत्राबाहेरील भागात संशोधन करताना ‘बोर’ नावाचे प्राचीन गाव अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. सध्या हा परिसर ‘बोर रिठ’ म्हणून ओळखला जातो. स्थानिक नागरिकांच्या मते येथे पूर्वी गवळी समाजाची वस्ती असावी; मात्र संशोधनातून या ठिकाणचा इतिहास त्याहून अधिक प्राचीन असल्याचे दिसून आले आहे.

प्रा. चोपणे यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी सुमारे १० हजार वर्षांपूर्वीच्या पाषाणयुगीन मानवांनी वापरलेली अवजारे, तीन हजार वर्षांपूर्वीच्या दगडी वस्तू, दोन हजार वर्षांपूर्वीची मातीची भांडी, प्राण्यांची हाडे, दात तसेच लोखंड वितळविणाऱ्या भट्ट्यांचे अवशेष आढळून आले आहेत.

मंदिराचे अवशेष आणि प्राचीन नाणी

संशोधनादरम्यान या परिसरात दोन शिवलिंगे, मंदिराचे भग्नावशेष आणि धार्मिक वास्तूंचे काही अवशेषही आढळले आहेत. सध्या या ठिकाणी हनुमान मंदिर उभारण्यात आले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना काही वर्षांपूर्वी प्राचीन नाणी आणि अलंकारही सापडल्याची माहिती मिळाल्याचे प्रा. चोपणे यांनी सांगितले.

आज या भागात शेती केली जात असली तरी जुन्या वस्तीचे अवशेष जमिनीत गाडले गेल्याने टेकडीसारखी रचना तयार झाली आहे. या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने उत्खनन झाल्यास आणखी महत्त्वाचे पुरावे समोर येऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर परिसरातील प्राचीन मानवी वस्ती

प्रा. चोपणे यांच्या संशोधनानुसार, इरई आणि झरपट नद्यांच्या खोऱ्यात पाषाणयुगीन काळापासून मानवी वस्ती होती. सुमारे ५० हजार वर्षांपासून या परिसरात आदिमानवांचे वास्तव्य असल्याचे पुरावे मिळतात. पुढे पाच हजार वर्षांपूर्वीपासून विविध आदिवासी समाजांनी येथे स्थायिक होण्यास सुरुवात केली.

पूर्वी बारमाही नद्यांच्या काठावरच मानवी वस्ती विकसित होत असे. त्यामुळे इरई व झरपट नदी परिसर हा प्राचीन संस्कृतींचा केंद्रबिंदू राहिल्याचे संशोधनातून स्पष्ट होत असल्याचे ते सांगतात.

पाषाणयुगीन स्थळांचा खजिना

दाताळा, नागाळा, देवाडा आणि आरवट परिसर हा देशातील महत्त्वाच्या पाषाणयुगीन स्थळांपैकी एक असल्याचा दावा प्रा. चोपणे यांनी केला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाषाणयुगीन अवजारे सापडली आहेत.

त्याचप्रमाणे झरपट नदीलगतच्या पापामिया टेकडी परिसरातही मोठे पाषाणयुगीन स्थळ आढळले असून तेथे शिवलिंग आणि हत्तीचे शिल्प मिळाल्याने त्या ठिकाणीही प्राचीन वस्ती अस्तित्वात असल्याचे संकेत मिळतात.

सातवाहन ते यादवकालीन पुरावे

बोर रिठ येथे एकाच ठिकाणी विविध कालखंडांतील पुरावे आढळल्याने या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढले आहे. येथे पाषाणयुगीन अवजारांसह सातवाहन काळातील मातीची भांडी, वाकाटककालीन अवशेष तसेच यादवकालीन पुरावेही सापडले आहेत.

यामुळे चंद्रपूर परिसरातील सर्वात प्राचीन वस्तींपैकी बोर रिठ हे एक महत्त्वाचे गाव असून तेच आधुनिक चंद्रपूर शहराचे मूळ गाव असावे, असा निष्कर्ष प्रा. चोपणे यांनी मांडला आहे.

गोंड राजांपूर्वीही होती वस्ती

चंद्रपूरचा इतिहास प्रामुख्याने गोंड राजवटीपासून मांडला जातो. मात्र त्याआधी या भागात सातवाहन, वाकाटक आणि यादव राजसत्तांचा प्रभाव होता. पुढे राजगोंड समाजाने शिरपूर, बल्लारपूर आणि चंद्रपूर परिसरात सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर भोसले आणि ब्रिटिश काळात शहराचा विकास झाला.

भद्रावती आणि भटाडा ही गोंडकालापूर्वीची महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. त्याचप्रमाणे चंद्रपूर परिसरातही अनेक आदिवासी व हिंदू गावे अस्तित्वात होती, असे संशोधनातून दिसून येत असल्याचे प्रा. चोपणे यांनी नमूद केले.

इतिहास संशोधनाला चालना देण्याची गरज

चंद्रपूरचा गोंडकालीन, भोसलेकालीन आणि ब्रिटिशकालीन इतिहास तुलनेने ज्ञात असला तरी त्यापूर्वीच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास अद्याप मर्यादित आहे. बोर रिठ येथे सापडलेल्या पुराव्यांमुळे चंद्रपूरच्या मूळ इतिहासाचा शोध घेण्यासाठी नव्या संशोधनाची दिशा मिळू शकते. पुरातत्त्व विभागाने या परिसरात शास्त्रीय उत्खनन केल्यास विदर्भाच्या इतिहासातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT