

चंद्रपूर : हिंगणघाट तालुक्यातील खेकडी येथील रहिवासी किसन करुंजी नांदकर (वय ४५) यांचा मृतदेह माहुली-बामर्डी मार्गावरील बंद धाब्याच्या शेडमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली.
मृत किसन नांदकर हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार असून, त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किसन नांदकर कामानिमित्त परिसरात आले होते. सकाळच्या सुमारास नागरिकांना ते माहुली-बामर्डी रोडलगत असलेल्या बंद शेडमध्ये बेशुद्ध अवस्थेत दिसून आले. माहिती मिळताच पोलिस व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
प्राथमिक अंदाजानुसार, रात्रीच्या वेळी शेडमध्ये झोपल्याने तसेच उष्णतेचा तडाखा आणि पाण्याअभावी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.