Chandrapur Tiger Death | शेतातील उघड्या विहिरीत पडून ७ ते ८ वर्षीय नर वाघाचा मृत्यू

सिंदेवाही तालुक्यातील हजारीचक येथील घटना; वनविभाग, एनटीसीए व पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत पंचनामा व शवविच्छेदन
Chandrapur Tiger Death | शेतातील उघड्या विहिरीत पडून ७ ते ८ वर्षीय नर वाघाचा मृत्यू
Chandrapur Tiger Death | शेतातील उघड्या विहिरीत पडून ७ ते ८ वर्षीय नर वाघाचा मृत्यूPudhari Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील हजारीचक येथे एका शेतातील उघड्या व कठडा नसलेल्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी उघडकीस आली. सकाळी मिळालेल्या माहितीनंतर वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील पाण्यावर तरंगत असलेला वाघ मृतावस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासणीत वाघाचा मृत्यू विहिरीत पडून बुडाल्याने झाल्याचे स्पष्ट झाले असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज रविवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास चारगाव येथील मिलिंद धनराज गजभिये यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनविभागाला माहिती दिली की, हजारीचक येथील शेतकरी पांडुरंग गोविंदा गजभिये यांच्या शेतातील विहिरीत वाघ पडलेला आहे. माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले, वनरक्षक एस. बी. चौधरी, आरआरयूचे कर्मचारी व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

तपासणीत डोंगरगाव नियतक्षेत्रातील हजारीचक येथील सर्व्हे क्रमांक 51 मधील शेतात कठडा नसलेली सिमेंट-दगडाची विहीर असल्याचे आढळले. विहिरीत अंदाजे 25 ते 30 फूट खोल पाणी होते. या पाण्यावर एक नर वाघ मृतावस्थेत तरंगताना दिसून आला. वनकर्मचाऱ्यांनी नायलॉन दोर व वाघरीच्या सहाय्याने वाघाला विहिरीबाहेर काढले.

वनविभागाच्या प्राथमिक निरीक्षणानुसार मृत वाघ हा अंदाजे 7 ते 8 वर्षे वयाचा प्रौढ नर वाघ होता. वाघाच्या शरीरावरील सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिकारी किंवा अवयव तस्करीचा कोणताही प्राथमिक पुरावा आढळला नाही.

घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर., सहाय्यक वनसंरक्षक अरविंद जे., राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) चे प्रतिनिधी बंडू धोत्रे तसेच स्वॅब नेचर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष यश कायरकर घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत घटनास्थळ पंचनामा करण्यात आला.

एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यानंतर डॉ. रविकांत खोब्रागडे (पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प), डॉ. विनोद सुरपाम (पशुधन विस्तार अधिकारी, सिंदेवाही) आणि बजरंग सावरे (पशुधन विकास अधिकारी, पेटगाव) यांच्या उपस्थितीत मृत वाघाची सखोल तपासणी करण्यात आली.

प्राथमिक निरीक्षणात वाघाचा मृत्यू विहिरीत पडून पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. सर्व अवयव शाबूत असल्याची खात्री करून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.  पंचनामा, शवविच्छेदन आणि इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या, पंचांच्या व उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने घटनास्थळीच मृत वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news