Chandrapur BJP City President Sacked
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला असून, प्रदेश नेतृत्वाने अंतिम केलेल्या उमेदवार यादीत परस्पर बदल केल्याचा ठपका ठेवत चंद्रपूर भाजपचे महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६६ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजप–शिंदे गट युतीच्या माध्यमातून ५८ जागांवर भाजप निवडणूक लढत आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील अंतर्गत गोंधळ समोर आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेल्या उमेदवार यादीत चंद्रपूर भाजपचे महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांनी परस्पर, स्वतःच्या मतानुसार बदल करत दहापेक्षा अधिक उमेदवार बदलून टाकल्याची माहिती पुढे आली. या बदलांमध्ये दहा पेक्षा जास्त नावे फेरबदल केल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेल्या यादीत बदल करणे हा प्रदेश नेतृत्वाचा अवमान मानत भाजपने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले. त्यानंतर आज बुधवारी दुपारी तत्काळ प्रभावाने कासनगोट्टुवार यांना महानगराध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्याचे अधिकृत कारवाई पत्र जारी करण्यात आले. हे पत्र प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी जारी केले आहे. पत्रात त्यांना महानगराध्यक्ष पदावरून तत्काळ प्रभावाने हटवण्यात येत असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच कासनगोट्टुवार यांची महानगराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यावेळीही त्यांच्या नियुक्तीला पक्षांतर्गत मोठा विरोध झाला होता. त्यांच्या निर्णयपद्धती, कार्यशैली आणि काही कारवाया या नेहमीच वादग्रस्त ठरल्याचे बोलले जात होते. प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेल्या उमेदवार यादीत बदल करणे हा त्यांच्यावरील असंतोषाचा कळस ठरला आणि त्यातून ही कठोर कारवाई करण्यात आली.
कारवाईनंतर पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, “अंतिम यादी बदलण्याचे आगाऊ धाडस, अति शहाणपण आणि नेतृत्वाला आव्हान देण्याची वृत्ती त्यांच्याच अंगलट आली” अशी चर्चा पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात रंगली आहे. काही कार्यकर्त्यांनी तर “शहाणपण आणि आगाऊचे धाडस त्यांना महागात पडले” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ऐन निवडणुकीत सुरू झालेला हा अंतर्गत गोंधळ भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. पक्षातील नाराजी, नेतृत्वाचा अवमान आणि अचानक झालेली पदच्युती यामुळे निवडणुकीतील समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधी पक्षांकडूनही या घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे संकेत आहेत.