Bhadravati Leopard Captured  Pudhari
चंद्रपूर

Bhadravati Leopard Captured |भद्रावतीत अखेर बिबट्या जेरबंद; वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची मागणी

स्मशानभूमी रोड परिसरातील विद्यार्थी, शेतकरी व पशुपालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Bhadravati Leopard Captured

चंद्रपूर : भद्रावती शहरालगतच्या स्मशानभूमी रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर करणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद केला. बिबट्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, पशुपालक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

स्मशानभूमी रोड परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर दिसून येत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी बिबट्याने भाऊराव धुळे यांच्या तीन बकऱ्यांवर हल्ला केल्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या मार्गाने दररोज शेकडो विद्यार्थी ये-जा करत असल्याने पालकांनीही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर भाजयुमो प्रदेश सचिव इमरान खान यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी धानुकटे यांच्याशी संपर्क साधून संबंधित परिसरात तातडीने पिंजरा उभारण्याची मागणी केली. स्थानिक माध्यमांनीही या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वन विभागाने घटनास्थळी पिंजरा उभारला.

वन विभागाच्या प्रयत्नांना काही तासांतच यश आले आणि बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेत परिसरातील नागरिकांना दिलासा दिला.

बिबट्या जेरबंद झाल्यानंतर नागरिकांनी वन विभागाच्या तत्पर कारवाईचे तसेच या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्यांचे आभार मानले. भविष्यात अशा संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त, अतिरिक्त पिंजरे आणि वन्यप्राण्यांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT