Cannibal tiger in forest department net at Nagbhid
नागभीड येथे नरभक्षक वाघ वनविभागाच्या जाळ्यात  
चंद्रपूर

नागभीडमधील नरभक्षक वाघ अखेर जेरबंद; २ शेतकऱ्यांना ठार करत घातला होता धुमाकूळ

पुढारी वृत्तसेवा

नागभीड तालुक्यात शेतावर गेलेल्या दोघांचे बळी घेणाऱ्या एका नरभक्षक पट्टेदार वाघाला शुक्रवारी (दि.26) दुपारी दीड वाजताच्या सुमारास वन विभागाच्या 30 कर्मचाऱ्यांच्या चमूने पकडण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे या भागातील शेतमजुरांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.

नागभीडामध्ये सध्या भात रोवणीचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यामूळे शेतकरी सकाळपासूनच शेतावर जाऊन काम करीत आहेत. या आठवड्यात मंगळवारी (दि.23) मिंडाळा येथील शेतकरी दोडकू झिंगरू शेंदरे (वय.60) हा रोवणीच्या कामाकरीता शेतावर गेला होता. शेत जंगलाच्या कडेला लागून असल्याने दबा धरुन असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले होते. त्यानंतर गुरुवारी (दि.25) नवानगर येथील जनाबाई जनार्दन बागडे (वय.51) या घरी परत येण्याच्या वेळी वाघाने महिलेवर हल्ला करून ठार केले होते.

दोन्ही घटनांमुळे या परिसरात प्रचंड दहशत पसरली होती. शेतकरी शेतमजूर कामावर जाण्यास धजावत नव्हते. वाघांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यामुळे सदर वाघावर पाळत ठेवण्यासाठी वन विभागाने त्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. तसेच नवानगर परीसरात वाघाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्यां निर्देशानुसानुसार 30 वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून जेरबंद करण्यासाठी नियोजन करण्यात वाघावर पाळत ठेवून होते. शुक्रवारी (दि.26) पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमाकांत खोब्रागडे यांच्या उपस्थितीत शुटर अजय मराठे यांनी डार्ट मारून वाघाला बेशुद्ध केले. त्यांनंतर त्याला पिंजऱ्यात बंदिस्त करून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. यावेळी तळोधी (बा.) चिमूर वनपरिक्षेत्राचे अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते.

SCROLL FOR NEXT