BRICS representatives Tadoba visit
चंद्रपूर : भारताच्या ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांतील मान्यवर प्रतिनिधीमंडळाने २५ एप्रिल रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देत भारतातील प्रगत वन्यजीव संवर्धन पद्धती आणि समुदायाधारित शाश्वत उपजीविका मॉडेल्सचा सखोल अभ्यास केला.
१८ व्या ब्रिक्स परिषदेनिमित्त नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (NADT) यांनी २० ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान ‘ब्रिक्स यंग टॅक्स प्रोफेशनल्स वर्किंग ग्रुप – क्षमता वृद्धी कार्यशाळा’ आयोजित केली होती. या कार्यशाळेअंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भेटीचे विशेष आयोजन करण्यात आले.
भेटीची सुरुवात पहाटेच्या सफारीने झाली. यावेळी प्रतिनिधींना प्रकल्पातील विज्ञानाधिष्ठित व व्यवस्थापनकेंद्री संवर्धन पद्धतींची माहिती देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी संरक्षण आणि देखरेखीसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक गस्त प्रणाली, रिअल-टाइम डिजिटल मॉनिटरिंग आणि गुप्त माहितीवर आधारित कारवाई याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
अधिवास व्यवस्थापनाच्या दृष्टीने गवताळ कुरणांची निर्मिती, सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणवठ्यांची उभारणी आणि देखभाल यांसारख्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच भक्षक–भक्ष्य संतुलन राखण्यासाठी आणि अधिवास जोडणीसाठी करण्यात येणाऱ्या स्थानांतरणासारख्या धोरणात्मक उपाययोजनांवरही प्रकाश टाकण्यात आला.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने गतिशील परिसंस्थेमध्ये संवर्धनाची आव्हाने पेलण्यासाठी अवलंबलेल्या समन्वित पद्धतीचे प्रतिनिधींनी विशेष कौतुक केले. सायंकाळी प्रतिनिधीमंडळाने ताडोबा परिसरातील स्वच्छतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सातारा गावाला भेट दिली. या भेटीत स्थानिक समुदायांचा संवर्धनातील सहभाग, शाश्वत उपजीविका आणि इको-पर्यटन उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले, ज्यातून मध्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले.
भेटीच्या शेवटी क्षेत्र संचालक, उपसंचालक (कोर व बफर) आणि वनाधिकाऱ्यांसोबत संवाद सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये लँडस्केप पातळीवरील संवर्धन धोरणे, मानव–वन्यजीव सहअस्तित्व आणि जैवविविधता संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व यावर चर्चा झाली.
ब्रिक्स प्रतिनिधींनी ताडोबा प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करत भारताच्या अध्यक्षपदादरम्यान संवर्धन क्षेत्रात घेतलेल्या पुढाकारांचे अभिनंदन केले. ही भेट जागतिक स्तरावर ज्ञानविनिमय आणि संवर्धन भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.