

Unique Wedding Chimur
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथील गुणवंत श्रावण चन्ने यांचा मुलगा विजय (नेताजी) आणि सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी नलेश्वर येथील यशवंत वासुदेव वनस्कर यांची कन्या गायत्री हिचा विवाह 21 एप्रिल रोजी अत्यंत अनोख्या आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. भजन-दिंडी, टाळ-मृदंग आणि पारंपरिक वाद्यांच्या सुरात रंगलेल्या या विवाह सोहळ्याने पंचक्रोशीत विशेष चर्चा रंगली आहे.
सध्याच्या काळात लग्नसोहळे डीजेच्या कर्णकर्कश आवाजात आणि आधुनिक धाटणीने पार पडताना दिसतात. मात्र मोहाळी नलेश्वर येथे पार पडलेला विजय उर्फ ‘नेताजी’ आणि गायत्री हिचा विवाह हा याला अपवाद ठरला. पूर्णतः पारंपरिक आणि भक्तिमय पद्धतीने साजरा झालेल्या या सोहळ्याने उपस्थितांचे मन जिंकले.
विजय हा आपल्या गावात ‘नेताजी’ म्हणून ओळखला जातो. तो गुरुदेव सेवा मंडळाचा सक्रिय सदस्य असून गावातील विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांत तो नेहमीच सहभागी असतो. ढोलक, तबला, पेटी वादनासोबतच त्याचे गायन कौशल्यही उल्लेखनीय आहे. याच कलागुणांचा प्रत्यय त्याच्या विवाह सोहळ्यात पाहायला मिळाला.
मोहाडी नलेश्वर येथे लग्नासाठी निघालेली वरात ही नेहमीप्रमाणे डीजेवर नव्हती, तर भजन-दिंडीच्या स्वरूपात होती. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीत स्वतः वर विजय छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावरील गाणी गात होता आणि ढोलकी वाजवत होता. गुरुदेव सेवा मंडळातील महिलांनी टाळ-मृदंगाच्या साथीने भजन गात या मिरवणुकीला अधिक रंगत आणली.
गावातून निघालेली ही भक्तिमय दिंडी थेट विवाह मंडपापर्यंत पोहोचली. मंडपाच्या प्रवेशद्वारावर वधू गायत्री हिने हातात तंबोरा घेतला, तर वराने ढोलकी वाजवत तिचे स्वागत केले. आणि लग्नाच्या स्टेजवर चालत गेले. या क्षणी संपूर्ण परिसर भक्तीच्या सुरांनी भारावून गेला होता.
विशेष म्हणजे या विवाहात मंगलाष्टकेही महिलांनी पारंपरिक पद्धतीने गायली, ज्यामुळे सोहळ्याला अधिक सांस्कृतिक आणि भावनिक उंची मिळाली. आजकाल विविध आधुनिक साधनांचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने लग्नसोहळे पार पडतात. मात्र विजयच्या विवाहाने साधेपणा, संस्कृती आणि भक्ती यांचा सुंदर संगम घडवून आणला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव या सोहळ्यातून दिसून आला.
या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून सर्वत्र या विवाहाची चर्चा सुरू आहे. भजन-दिंडीच्या माध्यमातून काढलेली वरात आणि त्यातून दिलेला भक्तीचा संदेश हा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. एकूणच, मोहाळी नलेश्वर येथे पार पडलेला हा विवाह सोहळा हा केवळ दोन कुटुंबांचा नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एक आदर्श ठरला आहे.