अवैध सावकारी, मानवी तस्करीविरोधात राज्यव्यापी एल्गार
प्रत्यक्ष पीडित शेतकऱ्याच्या घरी जाऊन भेट घेतली
जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांपैकी कुणीही साधी विचारपूस करण्यासाठीही वेळ काढला नाही
एक लाख रुपयांच्या कर्जासाठी तब्बल ७४ लाख रुपये वसूल
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात शेतकरी रोशन कुळे याला अवैध सावकारांच्या छळामुळे कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकावी लागल्याच्या धक्कादायक प्रकरणाने महाराष्ट्र हादरलेला असताना, या गंभीर अन्यायाकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष अस्वस्थ करणारे आहे, अशी घणाघाती टीका प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली. आज त्यांनी प्रत्यक्ष पीडित शेतकऱ्याच्या घरी जाऊन भेट घेतली आणि सरकारविरोधात उघड एल्गार पुकारत ३ जानेवारी रोजी लाँग मार्चची घोषणा केली.
नागभीड अवैध सावकारी प्रकरण अत्यंत गंभीर असून हा केवळ आर्थिक नव्हे तर शोषणाच्या माध्यमातून उघडकीस आलेला मानवी अत्याचाराचा गुन्हा आहे, असे ठाम मत व्यक्त करत बच्चू कडू यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. “पैसे नाहीत म्हणून अवयव विकावे लागणे ही लहान गोष्ट नाही. हा प्रकार केवळ नागभीडपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रभर, देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेणारा आहे,” असे ते म्हणाले.
बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, शेतकरी असल्यामुळे हे प्रकरण मोठे झाले नाही. “जर हा प्रकार धर्म किंवा जातीच्या नावावर घडला असता, तर गाव पेटले असते. आंदोलने झाली असती, घरे पेटवली गेली असती. पण शेतकरी आहे म्हणून सगळे शांत आहेत. हीच आपली शोकांतिका आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. जिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदार, खासदार किंवा पालकमंत्री यांपैकी कुणीही साधी विचारपूस करण्यासाठीही वेळ काढला नाही, ही बाब लाजिरवाणी असल्याचे त्यांनी नमूद केले.
“गावाने साधा निषेधही केला नाही, उपोषण झाले नाही, मोर्चा निघाला नाही. शेतकऱ्याच्या पाठीशी गाव उभे राहिले नाही. ही वेळ उद्या प्रत्येकावर येऊ शकते,” असा इशाराही त्यांनी दिला. दहा दिवस वाट पाहिली की कुणीतरी पुढे येईल, पण कोणीच आले नाही, म्हणून उशिरा आलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याचे मान्य करतानाच, केवळ सावकारी कायद्यान्वयेच गुन्हे दाखल झाले असून प्रत्यक्षात अपहरण, मानवी तस्करी आणि अवयव तस्करीचे गंभीर गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी मांडली. “ज्या पद्धतीने या शेतकऱ्याला विदेशात जाऊन किडनी काढण्यासाठी भाग पाडले गेले, त्याची चौकशी राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी होती. समिती नेमायला हवी होती, पण तसे झाले नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राज्यात केवळ पारंपरिक सावकारच नव्हे, तर मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातूनही सावकारी सुरू असून एकट्या नागभीड तालुक्यात सुमारे दहा मायक्रो फायनान्स कंपन्या कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला. “या कंपन्यांची दादागिरी सुरू आहे. पैसे न दिल्यास कुटुंबियांना अश्लील शिवीगाळ, अपमान आणि मानसिक छळ केला जातो. हे शब्द ऐकणेही अवघड आहे,” असे शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा बच्चू कडू यांच्यापुढे मांडल्या.
रोशन कुळे यांच्या प्रकरणात एक लाख रुपयांच्या कर्जासाठी तब्बल ७४ लाख रुपये वसूल करण्यात आले. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करून त्याच्याकडील सर्व काही हिरावून घेतले गेले. “विदर्भाचा मुख्यमंत्री असताना चंद्रपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात शेतकऱ्याची किडनी विकली जाते आणि तरीही सरकारकडून एक फोनही येत नाही, हे अत्यंत गंभीर आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंतीच्या दिवशी रोशन कुळे यांच्या घरापासून नागभीड तहसीलपर्यंत लाँग मार्च काढण्याची घोषणा केली. “हा लढा केवळ रोशनसाठी नाही, तर महाराष्ट्रातील सर्व शोषित शेतकऱ्यांसाठी आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना तयारीबाबत विचारणा केली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी हात वर करून लाँग मार्चला पाठिंबा दर्शविला. “आम्ही रोशन कुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहील,” असा निर्धार व्यक्त करत बच्चू कडू यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना पुढे येऊन अवैध सावकारीविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले.