चंद्रपूर : राजेश्वर येरणे
एका खेडेगावात, जेमतेम दीड एकर शेतीतून देशभरातील शेतकऱ्यांना समृद्ध करणारे संशोधन उभे करणारे दादाजी खोब्रागडे आणि त्या संघर्षाला मानवी स्पर्श देणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार. आज अजित पवारांच्या अचानक निधनाच्या बातमीने नागभीड तालुक्यातील नांदेड गावासह संपूर्ण चंद्रपूर जिल्हा सुन्न झाला आहे. एचएमटी तांदळाच्या प्रत्येक दाण्यात आज ‘दादा’ची आठवण पुन्हा जिवंत झाली आहे.
नागभीड तालुक्यातील साध्या परिस्थितीत राहणारे दादाजी खोब्रागडे हे केवळ एचएमटी तांदळाचे जनक नव्हते, तर त्यांनी एकूण नऊ धान्यवाणांचे संशोधन करून भारतीय शेतीला नवी दिशा दिली. एचएमटीसह नांदेड चिन्नोर, नांदेड हिरा, दीपक रत्न, विजय नांदेड, डी.आर.के., डी.आर.के.-१, डी.आर.के.-२ आणि काटे एचएमटी या जाती त्यांनी विकसित केल्या. विशेष म्हणजे हे संशोधन त्यांनी कोणत्याही प्रयोगशाळेत नव्हे, तर स्वतःच्या जेमतेम दीड एकर शेतीत, खेडेगावात राहून केले.
शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या एचएमटी धान्यवाणाचे संशोधन झाल्यानंतर त्यावर अनेकांनी दावा सांगण्याचा प्रयत्न केला. पंजाबराव कृषी विद्यापीठानेही आपणच हे संशोधन केल्याचा दावा केला होता. मात्र दादाजी खोब्रागडे यांनी प्रचंड संघर्ष करून हा दावा पुराव्यांसह खोडून काढला. विशेष बाब म्हणजे त्यांनी आपल्या हातात असलेल्या एचएमटी घड्याळावरूनच ‘एचएमटी’ हे नाव त्या वाणाला दिले होते.
या कार्याची दखल जागतिक कीर्तीच्या ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली. फोर्ब्सने दादाजी खोब्रागडे यांना आपल्या मासिकात ‘एचएमटी तांदळाचे जनक’ म्हणून स्थान दिले. ही बाब केवळ खोब्रागडे कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण भारतासाठी अभिमानाची होती.
२०१० साली नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आणि फोर्ब्स मासिकाने खोब्रागडे यांच्या कार्याची दखल घेतल्यानंतर, तेव्हाचे उपमुख्यमंत्री अजित पवार थेट नागभीड तालुक्यातील नांदेड या छोट्याशा गावात पोहोचले. त्यांनी दादाजी खोब्रागडे यांनी संशोधन केलेल्या संपूर्ण वाणांची पाहणी केली z घेतली आणि त्यानंतर जाहीर गौरव केला, देशभरातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि स्वतःच्या हाताने त्यांचा सन्मान केला.
याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाच एकर शेती देण्याची घोषणा त्यांनी केली. काही महिन्यांतच, २०११ मध्ये अजित पवार यांनी प्रत्यक्ष पाच एकर शेती खोब्रागडे यांना मिळवून दिली. त्याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या चंद्रपूरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनीही खोब्रागडे कुटुंबाला दीड एकर शेतीचा पट्टा देण्याचे मान्य करून तो वितरित केला.
अजित पवार थेट गावात येऊन कुटुंबीयांची भेट घेतली, आपुलकीने विचारपूस केली आणि “तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही आहोत” असा विश्वास दिला. त्या क्षणी दादाजी खोब्रागडे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब भावूक झाले होते. हा सन्मान सोहळा खोब्रागडे कुटुंबीय कधीही विसरू शकले नाही.
आज दादाजी खोब्रागडे यांच्या पश्चात त्यांचा मुलगा वित्रजीत खोब्रागडे, पत्नी इंदिरा, तसेच मुले विजय, दीपक आणि मनीष हे सर्वजण हा वारसा पुढे नेत आहेत. अजित पवारांनी दिलेल्या त्या शेतीत आजही एचएमटीसह इतर धान्यवाणांचे उत्पादन घेतले जाते.
आज सकाळी अजित पवार यांच्या अचानक निधनाची बातमी कळताच मित्रजीत खोब्रागडे आणि त्यांचे कुटुंब स्तब्ध झाले. पुढारीशी दूरध्वनीवर संवाद साधताना मित्रजीत खोब्रागडे अजित दादांच्या आठवणी सांगताना अश्रूंनी गहिवरले. “दादा आज नसले, तरी त्यांनी दिलेली शेती, दिलेला सन्मान आणि दिलेला विश्वास आम्ही जपत राहू. वडिलांचा वारसा जपत असतानाच अजित दादांच्या आठवणीही कायम तेवत ठेवू,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आज अजित पवार काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी एचएमटी तांदळाच्या प्रत्येक दाण्यात, नांदेड गावातील त्या शेतात आणि खोब्रागडे कुटुंबाच्या स्मरणात ‘दादा’ कायम जिवंत राहणार आहेत.