नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आपल्या पत्नीच्या नावाने कंपनी स्थापन करून मॉइलची १ कोटी ३५ लाख रुपयांनी एका अधिकाऱ्याने फसवणूक केली. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापेमारी केल्याने इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अरुण गज्जेलवार असे या मुख्य वित्त व्यवस्थापकपदी असलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. नारी रोड दीक्षित नगर येथील निवासस्थानी व कार्यालयात एकाच वेळी सीबीआयने ही कारवाई केली. सचिन गजलवार यांच्या निवासस्थानी तसेच धरमपेठेतील भगवाघर लेआउट परिसरात असलेल्या मेसर्स इझीकॉम सोल्युशन जरीपटक्यातील मेसर्स इको टेक सर्व्हिसेस व एका सहकारी व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही कंपन्या सचिन यांची पत्नी नीलिमा यांच्या नावाने आहेत.
मॉईलचे सीएमडी यांचे निकटवर्तीय अधिकारी असल्याने त्यांचा हा गैरप्रकार तातडीने कुणाच्या लक्षात आला नाही. दक्षता पथकाने या संबंधीची तक्रार 14 नोव्हेंबर 2022 रोजी केल्यानंतर खान मंत्रालयामार्फत पुढील सूत्रे हालवण्यात आली. दक्षता विभागाने या गैरव्यवहाराची चौकशी केली. चौकशीत अधिकारी सचिन यांनी आपल्या दोन कंपन्यांच्या माध्यमातून स्वतः व नातेवाईकांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची रक्कम वळती केल्याचे निदर्शनास आले.
कंपनीच्या नावाने एक कोटी पेक्षा अधिकचे कर्जही घेतले मात्र कर्जाची कंपनीच्या व्यवहारात नोंदच केली नाही हे सर्व आक्षेपार्ह व्यवहार नोव्हेंबर 2019 ते जानेवारी 2022 च्या काळात झाले. आता सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हे धाडसत्र आरंभल्याने मॉइलमधील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.
-हेही वाचा