सेवानगरात मिरची पिकाच्या बीजोत्पादनाला मिळाली चालना  pudhari photo
बुलढाणा

Buldhana News : सेवानगरात मिरची पिकाच्या बीजोत्पादनाला मिळाली चालना

अंढेरा येथे प्रधानमंत्री कृषी सिंचनची अधिकाऱ्यांकडून पाहणी

पुढारी वृत्तसेवा

देऊळगाव राजा : पाणलोट विकासाच्या माध्यमातून जलसंधारण व आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधत अंढेरा व सेवानगरात मिरची बीजोत्पदनाला चालना मिळाली आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतीला नवे बळ मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणलोट विकास घटक 2.0 च्या मध्यंतर मूल्यमापन कार्यक्रमांतर्गत अंढेरा व सेवानगर येथे विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.यशदा, पुणे येथील रिसर्च ऑफिसर डॉ. आर. व्ही. पोळ यांनी शेततळे, ढाळीची बांधबंदिस्ती तसेच अंतर्गत उभारलेल्या शेडनेट प्रकल्पाची यावेळी पाहणी केली.अंढेरा येथे उभारण्यात आलेले प्लास्टिक लाइनिंगयुक्त शेततळे आणि ढाळीवरील बांधबंदिस्तीमुळे पाण्याचा अपव्यय थांबून साठवण क्षमता वाढल्याचे निदर्शनास आले.

सेवा नगर येथील शेतकरी विनोद मोतीराम चव्हाण यांच्या शेडनेटमधील मिरची बीजोत्पादन प्लॉटला यावेळी भेट देण्यात आली. तिथे मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन व नियोजनबद्ध लागवडीमुळे दर्जेदार उत्पादन घेतले जात असून, प्रत्यक्ष तोडणी केलेली मिरची ट्रॉलीमध्ये साठवलेली पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पाण्याच्या उपलब्धतेमुळे मिरचीला फायदा झाला आहे.

पाण्याची उपलब्धता

शेतकरी विनोद चव्हाण यांनी सांगितले की, पाणलोट क्षेत्रातील कामांमुळे वर्षभर पाण्याची उपलब्धता राहू लागली आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीऐवजी मिरची बीजोत्पादनासारख्या नगदी पिकाकडे वळणे शक्य झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT