

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रजिस्ट्री कार्यालयांमधील बोगस दस्त नोंदणी आणि कार्यालयांमधील दलालांना आळा घालण्यासाठी नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयाने तीन स्तरीय उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये सीसीटीव्ही बसविणे, तीनपैकी एक कार्यालय इतरत्र हलविणे आणि टोकन सिस्टीम लागू करण्याचा समावेश आहे. या अनुषंगाने उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी बुधवारी (दि.25) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयांना अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली.
सर्व प्रकारच्या मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार नोंदविण्याचे काम नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांमध्ये होते. त्यासाठी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन, सातारा परिसरात दोन आणि उर्वरित आठ तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्येकी एक असे तेरा दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात अनेक अनधिकृत व्यक्ती बेकायदा काम करत आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांत बोगस दस्तांची नोंदणी झाल्याचेही उघडकीस आले आहे. या प्रकरणांमध्ये संबंधितांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांची गंभीर दखल छत्रपती संभाजीनगर विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी घेतली आहे. दलालांना आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आणि रजिस्ट्री कार्यालयांमध्ये टोकन सिस्टिम राबविण्याचे निर्देश त्यांनी लेखी स्वरूपात दिले आहेत.
यासोबतच गर्दी कमी करण्याच्यादृष्टीने तीनपैकी एक रजिस्ट्री कार्यालय इतरत्र हलविले जाणार आहे. दरम्यान, नोंदणी उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तिन्ही दुय्यम निबंधक कार्यालयांना अचानक भेटी देऊन झाडाझडती घेतली. यावेळी काही अनधिकृत व्यक्ती कार्यालयात कर्मचार्यांप्रमाणे बसल्याचे आढळून आले. त्यावरून भालेराव यांना अधिकार्यांना फैलावर घेतले. यावेळी सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे हेही होते.
दुय्यम निबंधकांना बजावली नोटीस
रजिस्ट्री कार्यालयात मंगळवारी एका व्यक्तीने दुय्यम निबंधकाच्या गैरहजेरीत त्याच्या खुर्चीचा ताबा घेतला होता. यावेळी संबंधित दुय्यम निबंधक सकाळी 11 वाजले तरी कार्यालयात हजर नव्हते. या प्रकरणात त्या व्यक्तीविरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हा प्रकार घडला त्यावेळी कार्यालयीन वेळेत गैरहजर असलेल्या दुय्यम निबंधकांना आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.