MLA Sanjay Gaikwad  Pudhari
बुलढाणा

MLA Sanjay Gaikwad | शेतकऱ्यांसाठी विकले खासगी भूखंड! आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उचलले मोठे पाऊल

MLA Sanjay Gaikwad | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी मात्र अत्यंत संवेदनशील आणि मदतीचा हात पुढे करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी मात्र अत्यंत संवेदनशील आणि मदतीचा हात पुढे करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांना तातडीने दिलासा देण्यासाठी त्यांनी स्वतःचे दोन भूखंड विकून त्यातून येणारी २५ लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा केली आहे. आमदार गायकवाड यांनी आज (मंगळवारी) त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

स्वतःच्या भूखंडाची विक्री, २५ लाखांची मदत

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी आमदार गायकवाड यांनी कोणताही सरकारी निधी न वापरता स्वतःच्या पदरची मदत देण्याचा निर्णय घेतला. बुलढाणा येथील सर्वे क्रमांक ४४ मधील त्यांच्या मालकीचे दोन भूखंड त्यांनी विकले आहेत. या भूखंडांच्या विक्रीतून येणारी २५ लाख रुपयांची रक्कम त्यांनी अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मोठ्या रकमेचा धनाकर्ष (Demand Draft) देखील तयार करण्यात आला असून, लवकरच तो मुख्यमंत्री सहायता निधीला दिला जाईल.

पत्रकार परिषदेत व्यवहारपत्राची प्रत केली सादर

या निर्णयाबद्दल बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांप्रती तत्पर संवेदनशीलता दाखवली. ही केवळ घोषणा नाही हे दाखवण्यासाठी, त्यांनी पत्रकारांना भूखंडाच्या विक्री व्यवहाराची प्रतच (कॉपी) दाखवली.

गायकवाड यांनी यावेळी जोर देऊन सांगितले की, "शेतकरी अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत, केवळ सरकारनेच मदत करावी असे न म्हणता सर्वांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा आणि मानवी संवेदनशीलता दाखवावी." त्यांनी इतर लोकप्रतिनिधी आणि सक्षम नागरिकांनाही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

संवेदनशीलतेचा नवा आदर्श

आमदार संजय गायकवाड यांचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी मानला जात आहे. राजकारणात अनेकदा निधी किंवा योजनांच्या घोषणा होतात, पण स्वतःच्या खासगी मालमत्तेची विक्री करून लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे, हे सामाजिक बांधिलकीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांच्या या कृतीमुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. नेहमी वादग्रस्त भूमिका घेणाऱ्या नेत्याने दाखवलेल्या या संवेदनशील भूमिकेमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पूर आणि अतिवृष्टीने शेतीत मोठे नुकसान झालेले असताना, ही २५ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना थोडासा तरी दिलासा देणारी ठरेल, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT