

बुलढाणा : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गरीब व गरजू लाभार्थ्यांसाठी असलेला रेशन तांदळाचा मोठा साठा काळाबाजारात विक्रीसाठी जात असताना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने धाड टाकून सुमारे ५८४ क्विंटल तांदूळ व ट्रक जप्त केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील कुरणगाड बु. गावात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेशन तांदूळ गोदामात साठवून तो गुजरातमध्ये विक्रीसाठी ट्रकद्वारे नेला जात असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार रविवार, २८ सप्टेंबर रोजी जळगाव जामोद–नांदुरा मार्गावर सापळा लावण्यात आला.
त्यावेळी संशयित ट्रक (क्र. जीजे ०३ सीयू २२८२) अडवून तपासणी करण्यात आली असता त्यात २४० क्विंटल रेशन तांदूळ (किंमत रु. ६,७९,८००) आढळून आला. चौकशीत ट्रकचालक भट्टी कादर कासम (५५, रा. अरबशेरी मालीया, जि. राजकोट, गुजरात) याने हा तांदूळ कुरणगाड बु. येथील आटोळे यांच्या गोदामातून आणल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी सदर गोदामाची तपासणी केली असता आणखी ३४४ क्विंटल रेशन तांदूळ (किंमत रु. १०,३२,०००) साठवलेला आढळला. एकूण ५८४ क्विंटल तांदूळ, किंमत अंदाजे १७.५२ लाख, तसेच २५ लाखांचा ट्रक असा मिळून ४२.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी वैभव सुनिल आटोळे (२५), अंकुश केशव आटोळे (२२) व ट्रकचालक भट्टी कादर कासम यांना जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत अटक करण्यात आली आहे.